कोरोनाचे सर्व नियम पाळून साहित्य संमेलन यशस्वी पार पाडणार

chagan bhujbal

नाशिक : यंदाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार हे निश्चित झाले आहे. यासाठी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून साहित्य मंडळाकडे मागणी केली होती. साहित्य महामंडळाकडून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे.

साहित्य संमेलनाचे आयोजन करताना कोरोनाविषयक सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी महानगरपालिका व शासनाच्या आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणारे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी सर्व साहित्यप्रेमी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संमेलनात कोरोनाविषयक सर्व काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिका व आरोग्य विभागाच्या सहकार्याने संमेलनस्थळी सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार आहे. येणाऱ्या प्रतिनिधींची आवश्यक असल्यास कोरोना चाचणी देखील करण्यात येणार असून यासाठी दातार लॅबचे सहकार्य घेण्यात येणार आहे. कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. संमेलनाचे काम सुलभ व समन्वयाने व्हावे यासाठी ३९ समित्यांद्वारे कामांची वाटणी करण्यात आली असल्याचे, भुजबळ यांनी सांगितले.

२६ मार्च रोजी सकाळी कवी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाहून मुख्य ग्रंथदिंडी निघणार आहे. या ग्रंथदिंडीला नाशिकरोड, सिडको, सातपूर, मखमलाबाद, पंचवटी आदी ठिकाणाहून येणाऱ्या दिंड्या डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर एकत्र येतील. त्यानंतर सर्व ग्रंथदिंड्या संमेलनस्थळी येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या