जवान-किसानांसाठी काम करणाऱ्या अक्षयला ट्रोल करण्याआधी जरा त्याचा दिलदारपणा पहा

दीपक पाठक – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान दि. २९ एप्रिलला पार पडले. मुंबईमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. परंतु, काही स्टार्सना मतदान करता आले नाही. त्यामध्ये आलिया भट्ट आणि अक्षय कुमारचाही समावेश आहे. अक्षयला आता तो भारताचा नागरिक नसल्याच्या मुद्द्यावरून ट्रोल केले जाऊ लागले आहे.

अक्षय कुमारने पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत मोदी यांनी आपल्या खासगी आयुष्यातील अनेक पैलू सांगितले होते. या मुलाखतीमुळे अक्षय विरोधकांच्या निशाण्यावर आला आहे. विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी या मुलाखतीवर चांगलचं तोंडसुख घेतले.यात सर्वात पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुलाखत घेणाऱ्या अक्षय कुमारवर टीका केली होती.

आपल्या देशात नेहमीच कलाकार आणि साहित्यिक यांना राजकारणी मंडळींकडून नेहमीच टार्गेट केले जाते. त्यामुळे एका अभिनेत्याला टार्गेट केलं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही हे सुरुवातीलाच स्पष्ट करणे आवश्यक आहे. याआधी अनेक कलाकारांना विविध मुद्द्यांमुळे राजकारणातील गुंडगिरीचा तसेच टीकेचा सामना करावा लागला आहे. अक्षय कुमारवर टीका करताना मुंडे यांनी त्याला भक्त म्हणून हिणवले आहे.एखाद्या अभिनेत्याने कुण्या नेत्याच्या मुलाखत घेतल्याने त्यावर विशिष्ट लेबल लावण्याचे ठरविले तर नुकतीच अभिनेता सुबोध भावे याने सुद्धा  कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत घेतली होती याबद्दल मुंडे सुबोधला कोणते लेबल चिकटवणार  ?

 

अक्षयच्या विविध चित्रपटांचा फोटो आणि त्यातच पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो पोस्ट करत मुंडे यांनी लिहिलं, ‘सोचता था के वो कितने मासूम थे, क्या से क्या हो गए देखते देखते.’ बॉलिवूड गाण्याच्या माध्यमातून मुंडे यांनी टोमणा मारला. ‘अरे इंटरव्यू होता की कौतुक सोहळा? आजपर्यंत अक्षय कुमारला मी ज्युनिअर मनोज कुमार समजत होतो हा तर भक्त निघाला..’ अशा शब्दांत त्यांनी अक्षयला चिमटा काढला.मात्र ही टीका करण्यामागे मुंडे भगिनींनी आयोजित केलेल्या बीड मधील परळी या ठिकाणी झालेल्या सर्वधर्मीय विवाहसोहळ्याला अक्षयने लावलेली हजेरीची सल यातून दिसून आली आहे.

ट्रोल करणाऱ्या मंडळींसाठी अक्षय कुमारच्या सामाजिक कामांची छोटीशी यादी
नवी दिल्लीत एका कार्यक्रमामध्ये त्यानं शहिदांच्या कुटुंबीयांना नुकतीच 13 कोटींची मदत केली. अक्षय ‘भारत के वीर’ हे देशभक्तीपर गीत लॉन्च करण्यासाठी गेला होता तेव्हा त्याने शहीद जवानांच्या परिजनांसाठी तब्बल 12.93 कोटी रूपयांची मदत केली. तसेच आसाममध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जवान नरपत सिंह हे शहीद झाले. त्यानंतर अक्षयनं त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांना 9 लाखांची मदत केली.

शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी अक्षय कुमारच्या संकल्पनेतून नवं अॅप तयार करण्यात आलं आहे. ‘भारत के वीर’ असं या वेब पोर्टलचं नाव असून या पोर्टलच्या माध्यमातून इच्छूकांना शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता येणार आहे. या पोर्टलसाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबियांना ही मदत पोहचवण्यात येत आहे.

 

छत्तीसगडच्या सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या 12 जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारने 1 कोटी 8 लाख रुपये मदत केली आहे.या हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले होते.

मुंबईतील नायगाव येथे त्याने पोलीस आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्याधुनिक सुविधा असलेलं रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.पोलिस आणि त्यांच्या कुटुंबांना उपचाराच्या काळात राहण्यासाठी चांगली सुविधा मिळेल. पोलिस देशासाठी मोठं योगदान देतात. आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा हाच खरा मार्ग असल्याचं अक्षयचं मत आहे.

यवतमाळमधील पिंपरी बुटी गाव दत्तक घेत त्याने शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला असून गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये अक्षय कुमारनं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. ज्या गावांमध्ये शेतकरी आत्महत्यांच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत, ते गाव अक्षय दत्तक घेण्याची इच्छाही त्यानं व्यक्त केली होती. त्यानुसार राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सर्वाधिक आत्महत्या झालेलं गाव सुचवण्यास सांगितलं होतं.

अक्षयकुमारने चेन्नई पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला . पूरग्रस्तांसाठी अक्षयकुमारने एक कोटी रुपयांची मदत दिली आहे.एका ट्रस्टतर्फे चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. ट्रस्टचे प्रमुख, निर्माते जयेंद्र यांच्याकडे अक्षयने मदतीचा चेक सुपूर्द केला.

याशिवाय बीडमधल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजाराची मदत केली प्रत्येक महिन्याला 15 लाख याप्रमाणे 6 महिन्यात एकूण 90 लाखांची मदत केली .

अक्षयच्या कामाची यादी खूप मोठी आहे. महिला,कष्टकरी,शेतकरी, जवान, पोलीस यांच्या वेदना त्याने जाणून घेतल्या व सढळ हाताने मदत देखील केली. असंख्य कलाकार, गब्बर झालेले उद्योजक ,अतिश्रीमंत नेते, कोट्यावधी रुपयांचं मानधन घेणारे क्रिकेटपटू असणाऱ्या या देशात अक्षयसारखा संवेदनशील व्यक्ती सापडणे दुर्लभच.तो भारताचा नागरिक आहे की नाही, त्याने किती कोटी रुपये दान दिले यापेक्षा त्याच्याकडे देण्याची दानत आहे हे ध्यानात घेणे आवश्यक आहे.