Breaking : जानकरांना दिलासा, विधान परिषदेची निवडणूक होणार बिनविरोध

टीम महाराष्ट्र देशा- विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठी रंगत आली होती मात्र आता भाजपचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं आहे. संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी ही घोषणा केली आहे.

पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज मागे घेणार की नाही यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून होते. अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भाजपच्या पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.या निर्णयामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्यावेळी भाजपमधून उमेदवारी भरणाऱ्या जानकरांनी यावेळी स्वत:च्या पक्षातून म्हणजेच रासपमधून अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करतेवेळी महादेव जानकरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या चरणी लोटांगण घातल्याचं चित्र पहायला मिळाले.अर्ज दाखल करताना जानकरांनी रासपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला होता. त्यांचा हट्ट भाजपने अखेर पूर्ण केल्याचं पाहायला मिळालं.

या निवडणुकीकरिता भाजपच्या वतीने विजय गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील आणि नीलय नाईक, शिवसेनेचे  अनिल परब आणि मनीषा कायंदे, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे शरद रणपिसे व वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

You might also like
Comments
Loading...