नेत्याच्या पोरानं गोळीबार केला नव्हता; मावळ प्रश्नावर आव्हाडांची सारवासारव

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हिंसाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरी राजकीय आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप, मनसे अशा पक्षांनी या बंदला विरोध करताना ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मावळ येथील गोळीबारासंदर्भात केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देत सारवासारव केली आहे.

लखीमपूर खेरीच्या घटनेची तुलना जालियनवाला बागशी केल्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मावळमध्ये गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग आठवले नाही का? राजस्थानमध्ये चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांना तुडवले गेले, काँग्रेस सरकारने बेछूट मारले, त्यावर का बोलत नाही? हे राजकीय वक्तव्य करत आहेत, हे राजकीय पोळी भाजण्याचे काम आहे. शेतकऱ्यांवर खरा अन्याय यांनीच केलाय, अशी टीका फडणवीसांनी केली होती. याला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देत भाजपवर पलटवार केला आहे.

मावळची दुर्घटना घडली. त्याची चौकशी केली. तो गोळीबार कसा गरजेचा होता, हे न्यायाधीशांनी मान्य केले. तुम्हाला संधी दिली होती ना तेव्हा. तुम्ही विरोधी पक्षात होता ना? त्यामुळे मावळचे उदाहरण देऊ नका. मावळमध्ये पोलिसांनी गोळीबार केला होता. पोलिसांच्या हातातून बंदुका घेऊन कोणत्या नेत्याच्या पोराने गोळीबार केला नव्हता. इथे या देशाच्या गृहराज्यमंत्र्याचा पोरगा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून चक्क गाडी घेऊन जातो. मावळचा गोळीबार हा पोलिसांचा होता. पोलीस आणि सामान्य जनतेत काही फरक आहे की नाही, असा प्रतिप्रश्न आव्हाड यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या