कोकणात राजकीय नेतृत्व मिळावे म्हणून कुणबी समाजातील नेते एकत्र

मुंबर्इ : कुणबी राजकीय संघटन समितीचे प्रमुख कृष्णा कोबनाक यांच्या पुढाकाराने मुंबईत एक महत्वाची बैठक रविवारी (२० ऑगस्ट) घेण्यात आली. या बैठकीला एकूण १०६ महत्वाच्या नेतेमंडळींची उपस्थिती होती. संघाध्यक्ष भूषण बरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सामाजिक प्रतिनिधत्व असायलाच हवे, भारतीय घटनेने दिलेला अधिकार याचा आपण कधी वापर करणार आहोत कि नाही? कोकणातील ७ जिल्ह्यात कुणबीबहुल मतदार असतानासुद्धा समाजाला एकही प्रतिनिधी नाही, ही खंत आम्हाला जास्त आहे, असे मत उपस्थित राजकीय मान्यवरांनी व्यक्त केले. गेले अनेक वर्ष समाजाचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. एकही आमदार कुणबी समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडत नाही. जर मत आमचे असेल तर नेते आमचे का नाहीत, असा सवाल उपस्थित करत सर्वांनी एक होऊ या व आजपासून कामाला लागू, असा ठराव बैठकीत झाला. या बैठकीला नंदकुमार मोहिते, शशिकांत धाडवे, आदी मान्यवर उपस्थित होते. कुणबी राजकीय संघटन समिती कोकणात विधानसभानिहाय बांधणीसाठी सक्रीय झाली असून सर्व संघटनाच्या समाज बांधवानी सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.