शेतकरी आणि सर्वसामान्यांचा नेता पडद्याआड – सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. ३१ : कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने शेतकरी आणि  सर्व सामान्यांचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. अशा शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

शोक संदेशात श्री. मुनगंटीवार म्हणतात, शांत संयमी आणि सर्वमान्य नेता  असा त्यांचा परिचय होता, सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी त्यांची  थेट नाळ जुळली  होती.

तीन वेळा अकोला मतदार संघाचे खासदार, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्ष नेता आणि कृषिमंत्री अशा विविध पदांवर सहजपणे काम करताना त्यांनी पक्षापलीकडे जाऊन नाती जोडली. सतत कार्यकर्त्यांच्या गर्दीत वावरणारा हा नेता होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती. विरोधी पक्षात असताना त्यांनी खामगाव ते आमगाव अशी शेतकरी दिंडी काढून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. आता कृषिमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करताना या क्षेत्रातील गुंतवणुकीवर अधिक भर दिला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच  त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो, असेही श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.