मराठा आरक्षण टिकण्याबाबत कायदेतज्ञ साशंक – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : आरक्षणासाठी धनगर समाजाला झुलवत ठेवले आहे; तर अलीकडे राज्य शासनाच्या अधिकारात बदल केल्याने मराठ्यांना देण्यात आलेले आरक्षण टिकेल की नाही, अशी भीती कायदेतज्ञच व्यक्त करत आहेत. एकूणच राज्य असो वा केंद्र शासन यांनी विकासाचा पुरता खेळखंडोबा केल्याने आता जनता परिवर्तन करणार, या भीतीने राज्यकर्त्यांना राम आठवायला लागला आहे. वाजपेयींचे व सध्याचे साडेचार वर्षांचे सरकार असतानाही यांना राम मंदिर का बांधता आले नाही? त्यामुळे रामनाम हा केवळ मतांसाठीच असून जात, धर्म, रामाच्या नावाने समाजात दुही व वैरभाव वाढविणाऱ्यांंच्या हातात हिंदुस्थानची सत्ता न देता देशात व राज्यात परिवर्तन करा, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले. पाटण येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, साडेचार वर्षांपूर्वी देशात व राज्यात वेगळे वातावरण निर्माण करत ही मंडळी सत्तेवर आली. केवळ मूठभर लोकांचा विकास डोळ्यांसमोर ठेवूनच ही कार्यरत आहेत. जातीयता, धर्मवाद एवढाच यांचा कार्यक्रम आहे. राम मंदिराला कोणाचाच विरोध नाही. तुमचे दोनदा सरकार आले; परंतु मंदिर उभे राहिले नाही. कारण, तुम्हाला मंदिरात रस नसून निवडणुकीत रामाच्या नावाने मते मागणे, हाच एकमेव उद्देश आहे. राफेल विमान खरेदीचा विषय आज गाजतो आहे. 530 कोटींवरून एका विमानाची किंमत थेट सोळाशे कोटींवर जाते, त्याचा खुलासा करणे सत्ताधाऱ्यांंचे काम आहे; मात्र ते तो करत नसल्यानेच मग ही मंडळी सत्तेचा वापर कशा पद्धतीने करते, हे लक्षात येते. यांना शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब यांच्याशी काहीच घेणे-देणे नाही. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्याने आता यांच्याबाबत विचार करण्याची नक्कीच वेळ आली आहे.