‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा मिळाला’ – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

उदगीर / प्रतिनिधी : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस च्या हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा १६ जानेवारी पासून सुरु झाला. आई तुळजाभावानी चे दर्शन घेऊन मराठवाड्याच्या भूमीत राष्ट्रवादीचा एल्गार आज शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील औसा, उदगीर मध्ये झाला.

उदगीर मधील सभेत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी युती सरकारला चांगलच धारेवर धरलं. ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा मिळाला’ असं म्हणत शेतकऱ्यांची कर्ज माफी तसेच शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नाचा पाढा वाचला. हे सरकार फसनविस सरकार आहे सरसकट शेतकरी कर्जमाफी मिळण्यासाठी हल्लाबोल आंदोलन करत असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला.

मुख्यमंत्री सभागृहात सांगत होते ‘मी पाच पिढ्याचा शेतकरी आहे’ त्यावर मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवत मुंडे म्हणाले, मी पण गायची धार काडू शकतो फक्त खाली बसता येत नाही. दुभती गाय घेऊन मी थेट मुख्यमंत्र्यांच्या घरीच जातो असंही धनंजय मुंडे म्हणाले. कपाशीवरील बोंडअळी, शेतकरी कर्जमाफी, विद्यार्थी शिष्यवृत्ती, एस टी कामगारांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नाने आंदोलने निघतात. मग सरकार काय काम करतं? जमीन विकून मिळवलेला पैसा, पावडर खाऊन बनवलेली बॉडी, आणि मोदी आणि देवेंद्र नेतृत्वात निवडून आलेले आमदार आणि खासदार जास्त काळ टिकत नाहीत असा हल्लाबोल धनंजय मुंडेंनी केला.