मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन आता राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली आहे.
त्यानंतर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी दर्पोक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलंय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे.
शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील कर्नाटक सरकारमधील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे.’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
पुढे त्यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. ‘अनेक वर्षांपासून कर्नाटकचे काही नेते अशाप्रकारचं राजकारण करत आहे. परंतु, कायद्याने काय व्हायचं ते होईलचं, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये. कुणी तिकडं काही बरळलं तरी इकडं आम्हाला फरक पडत नाही.’ असं संजय राऊत यांनी ठणकावलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप अडचणीत, गैरव्यवहार प्रकरणी बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांची चौकशी
- आता अंत पाहू नका, लोकांचा उद्रेक झाला तर थांबवता येणार नाही – उदयनराजे भोसले
- रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ५०% हिस्सा द्यावा : आ. पाटील
- चावटपणा करणाऱ्याला आतमध्ये टाका; रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर गुलाबराव पाटील संतापले
- …तर तीव्र आंदोलन करू – मराठा क्रांती मोर्चा