एसटीतील अधिकाऱ्यांच्या कनिष्ठ वेतनश्रेणींचा कालावधी आता एक वर्ष

टीम महाराष्ट्र देशा : नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. या अधिकाऱ्यांच्या कनिष्ट वेतनश्रेणीच्या कालावधीत 3 वर्षांवरून 1 वर्षांपर्यंत कपात करण्यात आलीय आहे. एसटी महामंडळाच्या तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे. दिवाकर रावतेंच्या अध्यक्षतेखाली आज एसटी संचालक मंडळाची बैठक झाली त्यात या निर्णयाला मंजुरी देण्यात आलीय.

कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही आता 1 एप्रिल 2017 पासून पूर्वलक्षी प्रभावाने नियमित वेतन देण्यात येणार आहे, असेही रावतेंनी स्पष्ट केले. एसटी महामंडळात नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत पहिली 3 वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. परंतु दिवाकर रावते यांनी 2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीतीळ सर्वच कर्मचाऱ्यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी 3 वर्षावरुन 1 वर्षे करण्यात येणार असून पहिल्या 6 महिन्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला 500 रुपये वेतनवाढ देण्यात येणार आहे. तसेच वर्षभर समाधानकारक काम केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पुढील वर्षांपासून नियमित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.

अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार एसटीत कार्यरत असलेल्या सुमारे 1 लाख कर्मचाऱ्यांपैकी विविध 25 संवर्गातील मिळून 12 हजार 514 कनिष्ठ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला असून, 1 एप्रिल 2017 पासून पूर्वलक्षी प्रभावाने त्यांचे सुधारित वेतन देण्यात येत आहे.