fbpx

पोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार – मुख्यमंत्री

नागपूर : महाराष्ट्र पोलिस दलाचा देशात नावलौकिक असून क्रीडा क्षेत्रातही उत्तम खेळाडू निर्माण झाले आहेत. पोलिस दलातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी पोलिस क्रीडा अकादमी सुरु करण्यात येईल. अकादमीमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.नागपूर शहर पोलिस मुख्यालय, शिवाजी स्टेडियम येथे आज 31वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा 2019 चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खेळ हा पोलिस दलासाठी अविभाज्य घटक आहे. यामुळे सांघिक भावना निर्माण होते. महाराष्ट्र क्रीडा स्पर्धा ही महाराष्ट्रातील पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात काम करतात. अशावेळी विविध खेळ प्रकारामुळे ताणतणावांचे व्यवस्थापन करणे सोयीचे जाते. क्रीडा स्पर्धेमुळे सांघिक भावना निर्माण होते. तसेच संघात खेळत असताना आपण उत्कृष्टपणे खेळावे ही भावना वैयक्तिक जीवनातदेखील मदतनीस ठरते.

यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, अपर पोलिस महासंचालक श्रीमती प्रज्ञा सरोदे, विशेष पोलिस महानिरीक्षक अनूप कुमार सिंग,विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र के. एम. एम. प्रसन्ना यांची प्रमुख उपस्थिती होती.