शिवसेनेसोबत युती करण्याच्या मुद्द्यावरून भाजपातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

टीम महाराष्ट्र देशा- एका बाजूला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह शिवसेनेसोबत युती करण्याची भाषा करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करू लागले आहेत. या निमित्ताने शिवसेनेसोबत युती करण्याच्या मुद्द्यावरून भाजपातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून मुख्यमंत्र्यांनाच शिवसेनेसोबत युती नको आहे अशी देखील चर्चा सुरु झाली आहे.

शिवसेनेने आपली स्वबळाची भूमिका यापूर्वीच जाहीर केली आहे. कोणत्याही परिस्थितीत विधान सभेवर भगवा फडकविण्याच्या दृष्टीने सेना आपली रणनीती आखताना दिसत आहे.  मात्र पाच राज्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भाजपकडून सेनेला पुन्हा गोंजारलं जात आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात शहा यांनी युतीबाबत शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याचं म्हटलं आहे. तसेच अद्याप शिवसेनेने युतीचा निर्णय घेतलेला नसला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आमच्यासोबत येईल आणि भाजप-शिवसेना युती निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे देखील शिवसेनेला सोबत घेण्याची भाषा करत असतात. मुख्यमंत्री देखील पत्रकारांशी बोलताना युतीची भाषा करत असतात मात्र आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना सोबत आली तर ठीक नाही तर आपण समर्थ आहोत, असं विधान मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी केलं .
त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तसेच या निमित्ताने शिवसेनेसोबत युती करण्याच्या मुद्द्यावरून भाजपातील अंतर्गत मतभेद देखील समोर आले आहेत.

You might also like
Comments
Loading...