चौकशीचा आणि माझ्या भाजप प्रवेशाचा काहीही संबंध नाही; हर्षवर्धन पाटलांचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

पुणे : भाजपमध्ये गेल्यावर ‘वाल्याचा वाल्मिकी होतो’ अशी टीका महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने केली जाते. तशी काही उदाहरणंही हे नेते देत असतात. आता माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या एका वक्तव्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी मावळमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलताना गमतीगमतीत एक वक्तव्य केलं होतं.

भाजपमध्ये आल्यापासून शांतपणे झोप लागते. कसली चौकशी नाही, असं पाटील म्हणाले. पाटील यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपला टोला लगावला. त्यावर आता हर्षवर्धन पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मी भाषणात कोणाचाही उल्लेख केलेला नाही. माझ्या वक्तव्याच्या अर्थाचा गैरअर्थ काढू नये. मला तिकीट नाकारलंय म्हणून भाजपमध्ये गेलो. मला तिकीट देण्याचं ठरलेलं असूनही मला तिकीट नाकारलं. त्यामुळे मला माझा राजकीय निर्णय घ्यावा लागला, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. चौकशीचा आणि माझ्या भाजप प्रवेशाचा काहीही संबंध नाही. उगाच त्याचा गैरअर्थ काढू नये, असं हर्षवर्धन पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या