चाकुचा धाक दाखवून व्यापा-याला लुटले, सातारा परिसरातील घटना

औरंगाबाद : छावणी परिसरातील डिलक्स बेकरीतून साहित्य घेऊन साता-याकडे जाणा-या फेरीवाल्या व्यापा-याला दोघांनी चाकुने वार करुन जखमी केले. ही घटना ५ एप्रिल रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास बीड बायपास, पेशवेनगरातील प्रल्हाद मंदिराशेजारी घडली.

बाबाराव रामराव शिंदे (४७, रा. पेशवेनगर, सातारा) हे छावणी भागातील डिलक्स बेकरीतून ब्रेड आणि टोस्टचा माल घेऊन रात्री जात होते. त्यावेळी दोघांनी त्यांना रस्त्यात अडवत चाकुने वार केला. याचवेळी शिंदे यांच्या पॅन्टच्या खिशातील नऊ हजार रुपये हिसकावून दुचाकीने पळ काढला. याप्रकरणी शिंदे याच्या तक्रारीवरुन सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्रावर चाकुने वार

तर दुसऱ्या घटनेत मुलीच्या नातेवाईकाला माझ्याबद्दल वाईट का बोलला ? याचा जाब विचारताच मित्राने मित्रावरच चाकुने वार केल्याची घटना ४ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास जिन्सी भागातील मकसूद कॉलनीच्या वळणावर घडली. इरफान रहीम शेख (२२, रा. रविंद्रनगर) व अनिस अजीज शेख (२२, रा. मकसुद कॉलनी) हे बालपणीचे मित्र आहेत. इरफान याचा साखरपुडा ठरलेला आहे.

इरफानच्या भावी पत्नीच्या नातेवाईकांना अनिस शेख याने त्याच्याबाबत चुकीची माहिती दिली. त्यावरुन मकसुद कॉलनी येथील वळणावर इरफान शेख हा अनिसला भेटला. तेव्हा तू माझा बालपणीचा मित्र असताना माझ्याबाबत भावी पत्नीच्या नातेवाईकांना चुकीची माहिती का दिली असा जाब विचारला. त्यावरुन अनिससोबत वाद होताच त्याने इरफानच्या डोक्यात व पोटावर चाकुने वार केला. याप्रकरणी इरफान शेख याच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या