पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शुक्रवारी उद्‌घाटन

पुणे  – ‘पुणे फिल्म फाऊंडेशन’, महाराष्ट्र शासन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने 13 ते 18 जानेवारी दरम्यान 16 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध भाषेतील व देश-विदेशातील चित्रपटांसह एकूण 46 चित्रपट दाखविले जाणार आहेत, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.

यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका भीमाबाई फुगे, आशा शेंडगे, अश्विनी जाधव, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे समर नखाते आदी उपस्थित होते. चिंचवड येथील कार्निव्हल सिनेमागृहात (बिगबाझारच्या वर) येत्या शुक्रवारी (दि.12) सायंकाळी साडेहसहा वाजता ज्येष्ठ सिने अभिनेते रणधीर कपूर, ऋषी कपूर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष जब्बार पटेल उपस्थित असणार आहेत.महोत्सवाच्या उद्‌घाटनापूर्वी सायंकाळी पाच वाजता पुण्यातील नामवंत गायक विवेक पांडे, गायीका कोमल, निवेदक घनशाम अग्रवाल आणि संगीत संजोयन चिंतन मोढा यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पुन्हा उर्वरित सुमधुर गीतांचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर सायलेंट मिस्ट व सिक्रेट इनग्रिडीएन्ट हे जागतिक स्तरावरील प्रसिद्ध चित्रपट दाखविले जाणार आहे.

महोत्सावात 22 देशातील चित्रपट दाखविले जाणार आहेत. तर, मराठीतील प्रसिद्ध न झालेले ‘व्हिडीओ पार्लर’, ‘पळशीची पेटी’, ‘मंत्र’, ‘फेज 4’ आणि सर्वनाम हे पाच चित्रपट दाखविले जाणार आहेत. प्रदर्शनात एकून 46 चित्रपट दाखविले जाणार असून गतवर्षीपेक्षा यंदा सहा चित्रपट जास्त दाखविले जाणार आहेत. या महोत्सवासाठी पालिका तीन लाख रुपये अनुदान आणि चित्रपटगृहाचा सर्व खर्च करते. त्यासाठी एकूण 15 लाख रुपये खर्च पालिका करत आहे. यंदाचे हे शहरातील महोस्तवाचे चौथे वर्ष आहे.पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहरवासियांसाठी पर्वणी आहे.

यामुळे चित्रपटसुष्टीत काम करु इच्छिणा-या शहरातील तरुणांना याचा मोठा फायदा होणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खूला असणार असून याचा शहरातील नागरिकांनी मोठ्या लाभ घेण्याचे आवाहन, महापौर नितीन काळजे व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले

You might also like
Comments
Loading...