आबांची ओळख कधीही महाराष्ट्राच्या मनातून पुसली जाणार नाही : शरद पवार

blank

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे लाडके आबा म्हणजेचं माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांची आज ६२वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यातून आर आर पाटील यांचे स्मरण केले जात आहे. आर आर पाटील यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी ओळख होती. त्यांनी आपल्या तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजकारणात अनेक पद भूषवली. ही पद केवळ भूषवली नसून त्या पदांवर आलेल्या व्यक्तीने काम कसे करावे याचा देखील आदर्श घालून दिला. याच आबांच्या 62व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी देखील स्मरण केले आहे.

शरद पवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंट वरून आबांचे स्मरण केले आहे. स्व.आर.आर.पाटील यांची उणीव आज प्रकर्षाने जाणवते.. आज सांगली-कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत आबांनी २००५ सालीच्या महापुरात केलेले काम आठवते. लोकांप्रतीची कळकळ आणि कर्तृत्वामुळे आबांना कधीही सत्तापदांच्या मागे जाण्याची वेळ आली नाही, उलट सगळी पदे आबांकडे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आली आणि त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले.

सत्तेत असतानाही कधी गावाकडच्या मातीला आणि मातीतल्या माणसांना आबांनी अंतर दिलं नाही. शेवटच्या माणसाशी आबांची नाळ जोडलेली होती. काहीच हातात नसताना आबा लोकांचे प्रश्न सोडवायला शिकले. आपल्या कार्यामुळे आणि धडाडीच्या निर्णयांमुळे आबांनी निर्माण केलेली ओळख कधीही महाराष्ट्राच्या मनातून पुसली जाणार नाही, असे शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या