गणेश मूर्ती बनवण्याचा पुण्यात असा रेकॉर्ड…

पुणे : यंदा सार्वजनिक गणेश उत्सव आपले शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्ताने पुणे शहरात विविध कार्यक्रम साजरे होत आहेत.यंदाचे वर्ष गणेश भक्तांसाठी खास असल्याने पुण्यात तर याचा वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.

याच निमित्ताने पुणे महापालिकेच्या वतीने सारसबागे जवळील सणस मैदानावर पर्यावरण पूरक शाडूच्या गणेश मूर्ती साकारण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार असून यामध्ये 160 शाळांमधील तब्बल 3 हजार 82 विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर,पालकमंत्री गिरीश बापट,महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते.या रेकॉर्डमध्ये सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला 3 किलो मातीची पिशवी आणि 2 बिया त्यामध्ये टाकण्यासाठी देण्यात आल्या आहेत.
आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने सकारात असताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

यापूर्वी हॉंगकॉंग मध्ये पहिले रेकॉर्ड करण्यात आले असून त्यावेळी 1082 गणपती मूर्तीं बनवण्यात आल्या होत्या , तर आता पुण्यात नवीन वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला असून अवघ्या 1 तास 31 मिनिटांमध्ये 3082 शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्यात आल्या आहेत.