जीभ घसरली तेंव्हाच लोकांना पालकमंत्र्यांचे नाव समजले- सुप्रियाताई सुळे

पुणे: हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. आज दौंड येथील सभेत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधला. ताई म्हणाल्या, अजितदादा जेंव्हा पालकमंत्री होते तेंव्हा दौंड भागातील एकही मुद्दा प्रलंबित नसायचा. पण आताचे पालकमंत्री कोण हे लोकांना माहित देखील नव्हते. जेंव्हा पालकमंत्र्यांची जीभ घसरली तेंव्हाच लोकांना पालकमंत्र्यांचे नाव समजले. असे टोले सुप्रियाताई सुळे यांनी लगावले.

भाजपच्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणावर टीका करताना सुप्रियाताई म्हणाल्या, भाजपचे लोक आज उपोषण करीत आहेत. आज एकादशी आहेच, लोक आज असाही उपवास करतातच. भाजपच्या लोकांचे हे उपोषण ढोंगी आहे.लिंबू सरबत पिऊन कोणतं उपोषण होतं का ? त्यामुळे उपोषण सोडा आणि थोडं काम करा. असा इशारा देखील दिला. तसेच या सरकारने चांगली नावे देऊन योजना जाहिर केल्या पण त्या योजनांना निधीच दिला नाही. त्यातल्या काही योजना तर फसव्या निघाल्या. मोठ्या दिमाखात जाहिर केलेल्या योजनांचे पुढे काहीच झाले नाही. असेही ताई म्हणाल्या.