भाजपच्या वाटेवर असलेल्या साताऱ्यातील ‘या’ दिग्गज नेत्याने घेतली महाजनांची भेट

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीत महायुतीने महाराष्ट्रात मिळविलेल्या अभूतपूर्व यशामुळे अनेक आघाडीतील दिग्गज नेते सेना-भाजपच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये रोज वेगवेगळी नावे समोर येत आहेत. यात अजून एका नावाची भर पडली आहे.

लोकसभा निवडणुकीत पानीपत झालेल्या काँग्रेसमध्ये पडझड सुरूच असून साताऱ्यातील माणखटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली. गोरे यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह महाजन यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर पाठोपाठ माढ्यामध्ये कॉंग्रेस – राष्ट्रवादी नेत्यांमध्ये वाद दिसून आला. माण – खटाव तालुक्यातील कॉंग्रेस आ. जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीला शह देत थेट भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांना जाहीर पाठिंंबा दिला होता, तर राष्ट्रवादीला रामराम करत गोरे यांचे दुसरे बंधू शेखर गोरे यांनी देखील भाजपचे काम केले होते. गोरे यांनी नुकतीच संगमनेर इथं काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप प्रवेश इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या असल्याची चर्चा रंगत असतानाच गोरे यांनी आज गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.