मोदी सरकारकडून हज यात्रेसाठी मिळणार अनुदान बंद

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली :  केंद्र सरकारकडून हज यात्रेकरुंना दिले जाणारे अनुदान यावर्षीपासून मिळणार नाही. केंद्र सरकारण मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण न करता अल्पसंख्यांकाना सक्षम करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे असे सरकारकडून सांगण्यात आले. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज यात्रेचे अनुदान बंद करण्यात आल्याची माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाने २०१२ साली २०२२ पर्यंत टप्याटप्याने हज यात्रेचे अनुदान बंद करण्याचे आदेश दिले होते. यावर्षी पासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही. केंद्र सरकारकडून दरवर्षी हज यात्रेवर अनुदानापोटी ७०० कोटी रुपये खर्च करण्यात येत होते. हीच रक्कम आता मुस्लीम मुलांच्या शिक्षणासाठी आणि अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या कल्याणासाठी उपयोगात आणली जाणार आहे. दरवर्षी लाखो लोक हजची यात्रा करतात. यावर्षी सुद्धा भारतातून १.७५ लाख लोक हज यात्रेला जाणार आहेत. पण त्यांना सरकारकडून कुठलेही अनुदान मिळणार नाही. एमआयएमने या निर्णयाचं जाहीरपणे स्वागत केले आहे.