डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्याला यावर्षीही होणार विलंब

प्रमुख पाहुण्यांच्या वेळा न मिळाल्याने होतोय 'उशीर'

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्याला यावर्षीही विलंब होणार आहे. मागील तीन वर्षांपासून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांचा पदवीप्रदान सोहळ्याला वेळ मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र, अद्यापही यश मिळालेले नाही. यावेळीही केंद्रीय मंत्र्यांसाठीच पदवीप्रदान सोहळ्याला विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले.

विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची डॉ. बी.ए. चोपडे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच वर्षी तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना पदवीप्रदान सोहळ्याला आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासाठी पदवीप्रदान सोहळा उशिराने घेण्यात आला, तरीही स्मृती इराणी यांनी वेळ दिली नाही. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बोलावून सोहळा उरकण्यात आला.

यानंतरच्या वर्षीही केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांना बोलावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनीच ‘नॅक’च्या संचालकांची वेळ घेण्यास सांगितले.  मागील वर्षी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह इतरांना निमंत्रण पाठविले. मात्र, कोणीही वेळ दिला नाही. यामुळे माजी परराष्ट्र सचिव निरुपमा राव यांना बोलावले.

आता यावर्षीही मार्च महिना उजाडला तरीही पदवीप्रदान सोहळ्याचा पाहुणाच ठरलेला नाही. याविषयी नवनियुक्त प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांना विचारले असता, त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांसह इतर काही नावांवर विचार सुरू असून यावर्षी जावडेकरांचा होकार मिळविण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला जाणार आहे, यात यश मिळेल, असे सांगितले.