शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय दुर्देवी व बेकायदेशीर – बाळासाहेब थोरात

The government's decision to close schools is malafide and illegal - Balasaheb Thorat

अहमदनगर : अडचणीच्या काळात सरकारने आईच्या भूमिकेतून शेतकरी व जनतेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.मात्र तसे होत नाही. सध्या कापसाला बोंडअळीचा वाढता प्रार्दुभाव,ऊस प्रश्नांबाबत सरकारचे गोंधळाचे धोरण यांसह राज्यातील पहिल्या टप्प्यातील १ हजार ३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय हा घटनेविरोधी, दुर्देवी व अत्यंत बेकायदेशीर असल्याची टीका काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.सरकारच्या विविध धोरणांबाबत बोलताना ते म्हणाले की,सरकार फक्त फसव्या जाहिराती व घोषणाबाजी करत आहेत.कायद्याने प्रत्येक बालकास शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आहे. १४ वर्षापर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे केले आहे.

मात्र पटसंख्येचे कारण दाखवून शासनाने सुमारे ५००२ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.मुळात या शाळा डोंगराळ व दुर्गम भागात आहेत.तेथे पटसंख्या कमीच असणार आहे.१ किलोमीटरच्या आत लहान मुलांना शाळा असणे गरजेचे आहे.शाळा बंद केल्यामुळे ६ वर्षांचे लहान मुल ३ किमी कसे जाणार आहे.प्रत्येक बालकास शिक्षण मिळाले पाहिजे, ते शाळेत आले पाहिजे व टिकले पाहिजे याची सर्व जबाबदारी सरकारची आहे. केरळमध्ये शिक्षणामुळे पुर्ण राज्य साक्षर झाले आहे. तेथे होते मग येथे का होत नाही ? असा सवाल केला.

कापूस प्रश्नावर ते म्हणाले की, विदर्भात बोंडअळीचा प्रार्दुभाव खूप वाढला आहे.खरे तर बिटी उत्पादनात सातत्याने संशोधन होणे गरजेचे आहे.यासाठी सरकारच्या कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांनी सतत शेतक-यांशी संवाद साधला पाहिजे.आपल्या कृषी मंत्री पदाच्या काळात विभागवार खरीप आढावा बैठका घेवून उत्पादनावर विविध बियाणे,धान्यांच्या जाती याबाबत चर्चा केली जाई,मात्र सध्या ते बंद होणे वाईट आहे.ऊस दराबाबत सरकारची ठोस भूमिका महत्वाची आहे. यासाठी राय व केंद्र सरकारने अनुदान दिले पाहिजे.

ग्राहकांना साखर स्वस्त द्यावी मात्र ऊस उत्पादक शेतकर्‍यांनाही लाभ मिळाला पाहिजे.यासाठी काही प्रमाणात अनुदान दिले पाहिजे. अन्यथा ऊसाला एफआरपी देणेही कारखान्यांना अवघड होणार आहे.कर्जमाफीची घोषणा झाली पण यावर शेतक-यांच्या विश्‍वास नाही. कर्जमाफीबाबत अजूनही संभ्रम आहे.एकूण सरकारच्या कोणत्याही क्षेत्रात अभ्यासपुर्ण नियोजन नाही.कोणतेही ठोस काम नाही.

मागील ३ वर्षाच्या काळात एकही नवीन विकास काम दिसत नाही. फक्त जाहीराती आणि घोषणा आहे.त्यामुळे भाजपा सरकारच्या अच्छे दिनचे स्वप्न हवेत विरले काँग्रेसने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने व देशाच्या जनतेच्या विकासाचे कामे केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षात नवचैतन्य निर्माण केले असून गुजरातमध्येही काँग्रेस सरकारच सत्तेवर येणार असून महाराष्ट्रातही पुढील सरकार हे काँग्रेसचेच असणार आहे असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.Loading…
Loading...