एकबोटे-भिडे यांना वाचवण्यासाठी सरकारचे कटकारस्थान – नवाब मलिक

दलित कार्यकर्त्यांवर माओवादयांचा शिक्का मारु नये ...

मुंबई  – मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना वाचवण्यासाठी आणि दलित कार्यकर्त्यामध्ये भीती निर्माण करण्यासाठी हा सरकारचा हा डाव आहे. सरकारला आम्ही सावधान करतोय आपण या पध्दतीचे राजकारण करु नये… खोटे गुन्हे तयार करु नये… दलित कार्यकर्त्यांना बदनाम करण्यासाठी माओवादयांचा शिक्का मारु नये… सरकारने अशापध्दतीचे राजकारण तात्काळ थांबवावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.

पुणे पोलिसांनी सुधीर ढवळे, अँड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत,रॉना विल्सन यांना अटक करण्यात केली. आणि त्याचा संदर्भ हा भीमाकोरेगावची जी घटना झाली त्या घटनेमध्ये माओवादयांचा हात होता असा जोडण्यात आला आहे. ३० डिसेंबर रोजी जी पुण्याच्या शनिवारवाडा येथे एल्गार परिषद झाली. त्या परिषदेला माओवादयांनी पैसा पुरवला. त्यांच्या पैशातून ही परिषद आयोजित करण्यात आली आणि एल्गार परिषदेमुळे भीमाकोरेगावची दंगल झाली असा दावा पुणे पोलिसांनी केला आणि त्या अंतर्गत या पाच लोकांना अटक करण्यात आली आहे. एकंदरीत पुणे पोलिस ज्याप्रकारे एल्गार परिषद आणि भीमाकोरेगाव घटनेशी लिंक जोडत आहेत. ज्यादिवशी घटना घडली २ तारखेला आंदोलन सुरु झाल्यानंतर भाजपकडून विविध वाहिन्यांवर एल्गार परिषद आणि भीमाकोरेगाव घटनेचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला गेला. ज्याप्रकारे संभाजी भिडे यांना क्लीनचिट देण्यात आली. मिलिंद एकबोटे यांना कुठेतरी वाचवायचे आहे आणि हिंदुराष्ट्रसेनेचे जे कार्यकर्ते ज्यांनी वडूजची घटना घडवून आणली. १ तारखेची भीमाकोरेगावची घटना घडवून आणली. त्यांना वाचवण्यासाठी ही कुणीतरी स्क्रीप्ट तयार करुन पुणे पोलिसांकडून सगळी घटना तयार करुन या पाच लोकांना अटक करवून घेतली आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.

कबीर कला मंचाच्या लोकांना कुठेतरी माओवादींशी त्यांचे संबंध आहे. असा एक प्लान आणि चित्र निर्माण करुन भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने भीमाकोरेगाव जात असताना त्यांच्यावर हल्ला चढवला. गाडयांची तोडफोड केली… काही लोकं गंभीर जखमी झाले आणि त्यामध्ये एका मुलाचा मृत्यूही झाला. या घटनेला जे कारणीभूत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी कुठेतरी दिशाभूल करण्यासाठी कारवाई करण्यात आली असाही आरोप नवाब मलिक यांनी केला.

यामध्ये गंभीर विषय असा की, आज कदम नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, माओवादयांचं म्हणणं आहे की, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आम्हाला मदत मिळते. आम्हाला वाटते की, राज्यसरकार वेगळया दिशेने या राज्याला घेवून जाण्याची तयारी दाखवत आहे. विरोधक हे माओवादी आहेत. संपूर्ण राज्यातले दलित कार्यकर्ते माओवादी आहेत असं चित्र निर्माण करणे हे राज्यासाठी धोकादायक आहे अशी भीतीही नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

देवेंद्रजी तुम्हाला भिडे यांना वाचवायचे असेल… एकबोटे यांना वाचवायचे असेल…ज्यांनी घटना घडवून आणली आहे…त्यांच्यावर कारवाई करायची नसेल आणि त्याच्यासाठीच याप्रकारच्या स्क्रीप्टेड कहाण्या तयार करु नये. संपूर्ण देशामध्ये दलित लोकांच्या मनामध्ये हे संघाचे…भाजपचे सरकार…मोदींचे सरकार…दलितविरोधी आहे ही मानसिकता निश्चितरुपाने त्यांच्या मनात गेलेली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

ज्याप्रकारे उत्तरप्रदेशमध्ये भीमआर्मीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात येते. आंबेडकर जयंतीच्या मिरवणूकीवर गोळीबार केला जातो. तशीच परिस्थिती आपल्याला या राज्यात निर्माण करायची आहे का?असा सवाल करतानाच ज्यापध्दतीने आपण राजकारण या राज्यामध्ये निर्माण करताय ते कुठेतरी या राज्यासाठी,देशासाठी घातक आहे असा इशाराही दिला.

समतावादी विचार, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विषमता दुर करुन कुठेतरी समतामुलक समाज निर्माण करण्याची भाषा करणे हा माओवाद विचार होवू शकत नाही. जर या देशामध्ये समाजवाद निर्माण करण्यासाठी चळवळ तयार होत असेल… जर कुठेतरी पुंजीवादी शक्तीविरोधी लढण्यासाठी ताकद होत असेल तर आजच्या घडीचे हे सरकार कुठेतरी भांडवलशाहीला समर्थन करणारे आहे. हे सरकार आल्यानंतर या देशातील संपत्ती कुठेतरी मोजक्या लोकांच्या हातात होती. त्याची संख्या आणखीन कमी झालेली आहे. श्रीमंत हे आणखीन श्रीमंत होत आहेत आणि संपत्ती काही लोकांच्या हातात केंद्रीत होत आहे. या देशातील घटनेमध्ये तरतुद आहे की भारत हा लोकतांत्रिक देश राहिला पाहिजे. मात्र ही व्यवस्था कुठेतरी अडचणीत येत आहे. समतामुलक समाज निर्माण करण्यासाठी किंवा चळवळ निर्माण करण्याची इच्छा जागृत होत असेल तर आणि त्याबाबतीत कुणी भाष्य करत असेल, कार्यक्रम घेत असतील आणि त्या लोकांना कुणी माओवादी शिक्का मारत असेल तर या देशासाठी,या राज्यासाठी घातक आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

जर एल्गार परिषद ही माओवादयांची परिषद होती तर त्या एल्गार परिषदेमध्ये हायकोर्टाचे दोन माजी न्यायमूर्ती हजर होते. त्यांना तुम्ही अटक करणार का?मला वाटतं हा सगळा प्रकार जो एल्गार परिषदेच्या माध्यमातून कुठेतरी दलित कार्यकर्त्यांना माओवादी बनवण्याचा प्रयत्न आहे. हे जे चित्र निर्माण करण्याचे काम सरकारची इच्छा असताना पुणे पोलिसांकडून होत आहे ते घातक आहे. हा सगळा खोटा दावा सरकारचा आणि पोलिसांचा आहे. एकंदरीत एकबोटे आणि भिडे यांना वाचवण्यासाठी दलित कार्यकर्त्यामध्ये भीती निर्माण करण्यासाठी हा सरकारचा हा डाव आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला

You might also like
Comments
Loading...