…. तर सरकार तातडीने विचार करेल : नारायण राणे

narayan rane and devendra fadnvis

मुंबई : राज्यामध्ये सुरू असणाऱ्या आंदोलनावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, या भेटीदरम्यान राज्यामध्ये सुरू असलेले आंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी दिली आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा करण्यात आली असून राज्यातील हिंसाचार बंद व्हावा, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांची आहे. तसेच आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यास सरकार प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले, असेही राणेंनी सांगितले. मराठा समाजाचे नेते आणि राणे समितीचे अध्यक्ष या नात्याने सरकार आणि मराठा समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मध्यस्थी करण्याचा माझा प्रयत्न असल्याचेही राणेंनी म्हटले.

प्रश्न सोडवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा लागेल, त्यामुळे राज्यामध्ये सुरू असणारे आंदोलन मागे घेण्याची विनंती नारायण राणे यांनी केली आहे. तसेच आंदोलन थांबल्यास सरकार तातडीने निर्णय घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हिंसक मार्गाने होत असलेल्या आंदोलनामुळे राज्याचे नुकसान होत आहे, मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी मी मध्यस्थी करायला तयार असल्याचेही राणे यांनी सांगितले. तसेच सरकार आरक्षण देण्यास सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मी आधीच नेता आहे त्यामुळे आंदोलनात नेता होण्यासाठी आलेलो नसल्याचे स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांसोबतच मी मराठा समाज आंदोलकांच्या समन्वयकांचीही भेट घेतली. मराठा आरक्षण मिळावे ही माझीही इच्छा आहे. त्यामुळेच माझ्या अंतर्गत नेमलेल्या समितीने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, ते आरक्षण कोर्टाने रद्द केल्याचे राणे यांनी सांगितले. नारायण राणे समितीच्या अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्यावर बोलताना, आम्ही दिलेलं आरक्षण हे तामिळनाडूतील आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले होते. मात्र, सरकार बदलल्यानंतर काही अडचणी आल्या आणि कोर्टाकडून हे आरक्षण रद्द करण्यातआल्याचे राणे यांनी म्हटले. तसेच सरकारने आरक्षणासंदर्भात चुका काढून मराठा समाजाची दिशाभूल करू नये. प्रयत्न करुन कोर्टाला कागदपत्रे सादर करावीत, असेही राणे म्हणाले.