सरकारने आरक्षणाविषयी भक्कमपणे कोर्टात बाजू मांडावी; खा. संभाजीराजेंचे साष्टपिंपळगावात प्रतिपादन

जालना : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनला खासदार संभाजीराजे भोसले यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी साष्टपिंपळगाववासीयांच्या जिद्दीला आणि एकीला सलाम करत जो निर्णय साष्टपिंपळगावच्या आंदोलकांचा असेल तोच निर्णय माझा असेल, असे प्रतिपादन केलं. ३३ दिवसांपासून हे ठिय्या आंदोलन सुरू असून ७ मार्चला मराठा आरक्षण आक्रोश मोर्चा होणार आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाची दखल गांभीर्याने घेत नसेल तर हे सरकार अपयशी आहे, असे यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या मागण्यांबाबत सरकारला जागृत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपला लढा रास्त आहे म्हणून मी प्रजेसोबत आहे. साष्टपिंपळगाव आंदोलकांच्या भावना या सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या आहेत. त्यामुळे मी आपल्यासोबत आहे. यापुढेही आपण जो निर्णय घ्याल, त्या निर्णयासोबत हा संभाजी छत्रपती असेल, असे संभाजीराजे म्हणाले. साष्टपिंपळगाव आंदोलकांमुळे पुन्हा घराघरात एकजूट झाली आहे. पुढील काळात सरकारने आरक्षणाविषयी भक्कमपणे कोर्टात बाजू मांडावी, असेही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण मिळेपर्यंत आपल्या साष्टपिंपळगावचे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे. जर सरकारने मराठ्यांच्या हक्काच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर ७ मार्चला साष्टपिंपळगावात राज्यातील लाखो मराठ्यांचा “आरक्षण आक्रोश’ होणार आहे. सरकारला घाम फोडल्याशिवाय शांत बसणार नाही. कोरोनाच्या नावाखाली १४४ सारखे कलम लागू करून शांतता मार्गाने चाललेले आंदोलन सरकारने दडपशाही करून दडपण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.

महत्वाच्या बातम्या