‘आम्ही ‘गांधीं’ना मानतो तसे ‘सुभाषचंद्र बोस’ यांनाही मानतो, हे सरकारने लक्षात ठेवावे’

Sambhaji Patil Nilangekar

लातूर : मराठवाड्यातील नागरिक ज्या प्रमाणे महात्मा गांधींना मानतात, त्याच प्रमाणे सुभाषचंद्र बोस यांनाही मानतात, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी लातूरमध्ये ७२ तास अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या निमित्त ते बोलत होते.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७२ तास अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर या आंदोलनाचे नेतृत्त करत आहेत. शेतकरी उपाशी मरत असला तरी राज्य सरकारला त्याची दखल घेण्यासही वेळ नसल्याचा आरोप या वेळी आमदार निलंगेकर यांनी केला.

लातूरेच पालकमंत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील चित्रपट गृहे, तमाशा मंडळे खुली करण्याची घोषणा करतात. मात्र, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याविषयी बोलण्यास त्यांच्याकडे वेळ नाही, असा आरोपही आमदार निलंगेकर यांनी केला. या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांना लवकर मदत जाहीर करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.

महत्त्वाच्या बातम्या