आर्थिक मंदी, बेरोजगारीकडे सरकार दुर्लक्ष करतंय; संजय राऊतांचा सरकारवर आरोप

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेकडून सरकारवर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी देशातील आर्थिक मंदी आणि बेरोजगारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सरकार वर केला आहे.

संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना देशातील आर्थिक मंदीकडे आणि बेरोजगारीकडे सरकारचं लक्ष नाही तसेच आम्ही सत्तेत असलो तरी सरकारच्या कमकुवत आर्थिक धोरणांवर टीका करणारचं असंही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पाकिस्तान विरोधातील कारवाई, कलम ३७० हटवणं, ट्रिपल तलाक कायदा याला आमचा पाठिंबा आहे. त्याबद्दल मोदी सरकार, अमित शाह यांचं वेळोवेळी अभिनंदनही केलं आहे. पण, आता देशाला आर्थिक खाईत लोटण्याचं समर्थन कसं करणार असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

तसेच पुढे बोलताना राऊत यांनी ‘आज ऑटोमोबाईल सेक्टर, लहानमोठे उद्योगधंदे धोक्यात आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. लोकांना जीएसटी काय, नोटबंदीमुळे काय झालं याच्याशी घेणं-देणं नाही. त्यांना त्यांची रोजीरोटी महत्वाची आहे. सरकारच्या कोणत्याही निर्णयानं जर रोजगार जात असेल तर असा निर्णय लोकांच्या दृष्टीनं घातकच आहे असं वक्तव्य केले आहे.

दरम्यान, राऊत यांनी महाराष्ट्रातल्या उद्योगांवरही मोठं आरिष्ठ आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर भूमिका घेतली पाहिजे. बाहेरच्या राज्यातले उद्योगधंदे ठप्प होत आहेत. तिथले लोंढे महाराष्ट्रात येतील त्याचं तुम्ही काय करणार? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.