सरकारने फसवल्याची खंत, मुलगी बोहल्यावर चढताच धनगर आरक्षाणासाठी पिता फासावर

blank

औरंगाबाद : मराठा आरक्षणा पाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा मुद्दा आणखीनच तीव्र होताना दिसत आहे. ज्या प्रकारे मराठा आरक्षणासाठी राज्यात अनेकांनी आपले प्राण दिले, त्याचीच पुनरावृत्ती धनगर आरक्षणाच्या मुद्द्याच्या बाबतीत होताना पहायला मिळतेय. औरंगाबादमध्ये मुलगी बोहल्यावर चढताच धनगर आरक्षाणासाठी पित्याने आत्महत्या केल्याची धक्कदायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत मुलीचा विवाह पार पडताच आत्महत्या करणाऱ्या पित्याचे नाव मनजित कोळेकर आहे. ते औरंगाबाद जिल्ह्यातील असून मनजित यांना धनगर आरक्षण लढ्यातील आक्रमक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते.

कोळेकर यांच्या कन्येचा विवाह १७ डिसेंबर रोजी झाला. मुलगी बोहल्यावर चढेपर्यंत पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करणारे मनजित कोळेकर यांनी अक्षता होताच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

आत्महत्येपूर्वी कोळेकर यांनी दोन सुसाईड नोट लिहिल्या आहेत. ‘मी सर्व समाजबांधवाना विनंती करतो कि, आपल्याला सर्व राजकारण्यांनी आणि भाजप सरकारने फसविले आहे. अनेक बळी गेल्यावर मराठा समाजाला आरक्षण दिले. आत्महत्या केल्यावरच आरक्षण द्यायचे असेल, सरकारला बळीच पाहिजे असल्यास मी मुलीच्या लग्नानंतर निर्णय घेणार आहे. मी या जगात राहणार नाही. तरी आरक्षण मागणीचे युद्ध सुरु ठेवावे. फक्त माझी आठवण ठेवावी. असे मनजित कोळेकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

दरम्यान,शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी जनजातीय कार्य मंत्रालयाकडे धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काय पावले उचलली आहेत, याबाबतची माहिती मागितली होती. यात राज्यातील धनगर समाजाला शेड्यूल ट्राइब अर्थात एसटी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासंदर्भातील प्रस्तावच राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून धनगर आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा पुरावाच जनजातीय कार्य मंत्रालयाने दिला आहे.