‘तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी’, मुख्यमंत्र्यांचा नुकसानग्रस्तांना विश्वास

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमध्ये दाखल झाले. चिपळूण व खेडमध्ये पुराचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चिपळूणमधील बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा तेथील प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी देखील या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत धीर दिला. ‘तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना दिला.

‘महापुराच्या संकटात जीवितहानी होऊ न देणं ही पहिली प्राथमिकता असते. दुर्देवाने काल दरडी कोसळल्या. त्या ठिकाणी मी गेलो होतो. उद्या पुन्हा जाणार आहे. तुमचे जे नुकसान झालं. त्याची काळजी करू नका. तुम्हाला तुमच्या पायावर कसे उभे करायचं याची जबाबदारी सरकार घेईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाजारपेठेत फिरून पुराच्या पाण्यामुळे झालेले नुकसान पाहिले. त्यांच्याशी संवाद साधला. अनेक घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांनी मुख्यमंत्र्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी अनिल परब, भास्कर जाधव, उदय सामंत, सीताराम कुंटे यांची देखील उपस्थिती होती.

पुराच्या काळात आम्हाला मदत मिळाली नाही. पूरपरिस्थितीदरम्यान, मदतीसाठी झालेल्या उशिरासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी चिपळूणवासियांनी केली. तसेच पुरामुळे आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. आम्हाला या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकदा कर्जमाफी द्या आणि दोन टक्के दराने कर्ज द्या अशी विनंती चिपळूणमधील व्यापाऱ्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या