शिवसृष्टीबाबत सरकारच दुटप्पी राजकारण; पुणेकरांची फसवणूक- अजित पवार

ajit pawar vr babasaheb purandare

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या खासगी ट्रस्टतर्फे आंबेगावात उभारल्या जाणाऱ्या शिवसृष्टीला सरकारकडून ३०० कोटी रुपये आणि कोथरूडमध्ये प्रस्तावित शिवसृष्टीला बीडीपीची जागा. हि पुणेकरांची फसवणूक असल्याचे अजित पवार म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी लाल महालात आयोजित केलेल्या बहुजन अस्मिता परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, बाबासाहेब पुरंदरेच्या शिवसृष्टीला निधी देण्याऐवजी सरकारने गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ती रक्कम खर्च करावी. पुणे महापालिकेने शिवसृष्टी उभारण्यासाठी कोथरूडची जागा निश्चित केली होती. या ठिकाणी मेट्रोचे स्थानक असल्याने त्यावर स्लॅब टाकून शिवसृष्टी करता आली असती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची सह्याद्री येथे बैठक घेत शिवसृष्टीला बीडीपीची जागा सुचविली आहे. त्यानंतर दोन दिवसांत आंबेगाव येथील बाबासाहेब पुरंदरेंच्या ट्रस्टतर्फे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला ३०० कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. एकीकडे महापालिकेची शिवसृष्टी बीडीपीत हलवली जात आहे, तर दुसरीकडे पुरंदरेंच्या शिवसृष्टीला ३०० कोटी रुपये दिले जात आहेत. हे दुटप्पी राजकारण असून पुणेकरांची फसवणूक आहे, अशी टीका अजित पवारांनी केली त्यांनी केली.