fbpx

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात होणार सामान्य जनतेच्या सूचनांचा समावेश

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकींची धामधूम सर्वत्र सुरु आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी जनतेकडून सुचना मागवल्या आहेत.कॉंग्रेस कडून तयार करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात जनतेच्या सूचना असणे आवश्यक आहेत असा आग्रह राहुल गांधींचा असल्याने प्रत्येक राज्याच्या समितीला संकेतस्थळ जाहीर करून त्यावर सुचना मागवाव्यात असे कळवण्यात आले आहे.

यासंदर्भातच जाहीरनामा समितीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेबरोबर विधानसभेसाठी देखील जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान याच बैठकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय असावे यासंबधी नागरिकांनी आपल्या सुचना [email protected] या संकेतस्थळावर द्याव्यात असे आवाहन करण्यात आले.

तसेच कृषी, उद्योग, सामाजिक, सामाजिक न्याय, नागरी प्रश्न यासाठी उपसमित्या नियुक्त करण्यात येणार आहेत. या सर्व उपसमित्यांनी नागरिकांकडून आलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून उपसमित्यांनी या प्रश्नांचा अहवाल समितीला सादर करायचा आहे. त्यानंतर केंद्रांशी संबधित असलेल्या सुचना काँग्रेस महासमितीकडे दिल्लीत पाठवण्यात येतील व राज्याची संबधित सुचनांचा विधानसभेसाठीच्या जाहीरनाम्यात समावेश केला जाईल अशी माहिती आमदार गाडगीळ यांनी दिली.

या बैठकीला मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या तीन सदस्यांबरोबरच पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, आमदार अनंत गाडगीळ व समितीचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते.