नारायण राणे यांच्यासारखे कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये यावेत – चंद्रकांत पाटील

chandrakant-patil

रत्नागिरी : नारायण राणे यांच्यासारखे कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षात यावेत असे मला वाटते. मात्र त्यांच्या प्रवेशाचा निर्णय केंद्रीय स्तरावर होणार आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाची कुठलीही तारीख अजून ठरलेली नाही, असे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे सांगितले.गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी अलीकडेच संपलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात दिले होते. आमदारांसह महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी काल रायगड जिल्ह्यात पाहणी केली. आज त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट दिली. जिल्ह्यात आल्यानंतर सावंतवाडी येथील पर्णकुटी या शासकीय निवासस्थानी त्यांनी शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी महामार्गाची दुरुस्ती वेळेत होईल, असे सांगितले. यावेळी पत्रकारांनी त्यांना नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, राणे पक्षात आले, तर नक्कीच फायदा होईल. त्यांच्यासाठी माझे सार्वजनिक बांधकाम खाते दयायची वेळ आल्यास ते मी कधीही देण्यास तयार आहे. हे खाते मला नको असल्याचे मी यापूर्वीच पक्षाला सांगितले होते, असेही ते म्हणाले. राणे यांच्या प्रवेशाचा मुहूर्त अजून ठरलेला नाही. त्यांनी पक्षात यावे. त्यांचे आम्ही स्वागत करू. राणे माजी मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत पक्षाचे अध्यक्ष अमित शहा निर्णय घेत आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, अतुल काळसेकर, महेश सारंग, दत्ता कोळंबेमेकर आदी उपस्थित होते.दरम्यान, पाटील यांनी मुंबई-गोवा महामार्गाची झाराप येथे पाहणी केली. त्यावेळी त्यांचे स्वागत आमदार वैभव नाईक यांनी केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, जि. प. सदस्य संजय पडते, राजू कविटकर, बबन बोभाटे, रमाकांत तामाणेकर, योगेश धुरी इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.