मनपाच्या विद्यार्थिनींची अंतरिक्षातील भरारी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे विशेषत: गरीब घरातील आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठी प्रतिभा आणि क्षमता आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते अंतरिक्षालाही गवसणी घालू शकतात. ही बाब मनपाच्या दोन विद्यार्थीनींनी खरोखरच अंतरिक्षात झेप घेउन सिद्ध केली आहे. या विद्यार्थिनींमध्ये ती क्षमता रूजविण्यासाठी प्रयत्न केलेल्या शिक्षक, शिक्षिकांचे मनापासून अभिनंदन. मनपाच्या विद्यार्थिनींचे हे यश इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरेल यात शंका नाही, अशा शब्दांमध्ये नागपूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वाती विनोद मिश्रा व काजल रामनरेश शर्मा या मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींचा गौरव केला आहे.

तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे होणाऱ्या जागतिक रेकॉर्डसाठी देशभरातील १ हजार विद्यार्थ्यांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या स्वाती मिश्रा व काजल शर्मा या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे. देशभरातील १ हजार विद्यार्थी १०० उपग्रह तयार करीत असून ते ७ फेब्रुवारीला अंतराळात सोडले जाणार आहेत. मनपा शाळेतील विद्यार्थीनींच्या या यशाबद्दल महापौर कक्षामध्ये नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी यांनी सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या दोन्ही विद्यार्थिनींसह विज्ञान विषयाच्या शिक्षिका दीप्ती बिस्ट यांचा सत्कार केला. यावेळी आमदार प्रवीण दटके उपमहापौर मनीषा धावडे, प्रतोद दिव्या धुरडे, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रदीप पोहाणे, राजेंद्र सोनकुसरे, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, विनय बगले, सुरेंद्रगड शाळेच्या मुख्याध्यापिका छाया कौरासे, शिक्षिका कल्पना मालवे आदी उपस्थित होते.

सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक विद्यालयातील स्वाती विनोद मिश्रा व काजल रामनरेश शर्मा या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी आहेत. मागील दोन वर्षापासून दोन्ही विद्यार्थिनी उपग्रहांच्या जागतिक विक्रमासाठी कार्य करीत आहेत. यासाठी त्यांना डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फाउंडेशनचे डॉ.मिलिंद चौधरी व डॉ. मनीषा चौधरी आणि ज्ञान फाउंडेशनचे डॉ.अजिंक्य कोतावार व डॉ. विशाल लिचडे यांनी विशेष सहकार्य केले. जागतिक विक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांकडून १० हजार रूपये शुल्क घेण्यात येतात. मात्र मनपा शाळेतील विद्यार्थिनींची प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ध्येय प्राप्तीकडील चिकाटी पाहता हे शुल्क माफ करण्यात आले. दोन्ही विद्यार्थिनींचे पालक सुरेंद्रगड भागात झोपडपट्टीमध्ये राहत असून त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे.

रामेश्वरम येथे ७ फेब्रुवारीला जगातील सर्वात कमी वजनाचे १०० उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत. देशभरातील १००० विद्यार्थ्यांद्वारे हे उपग्रह तयार करण्यात येत आहे. स्वाती मिश्रा व काजल शर्मा या विद्यार्थिनींमार्फत ‘फेम्टो’ हे उपग्रह तयार करण्यात येत असून हे उपग्रह अंतराळात ३३ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर जाउन प्रत्यक्ष वातावरणाची माहिती घेईल व पृथ्वीला पाठविणार आहे. ‘फेम्टो’ या उपग्रहाचे वजन केवळ ५० ते ८० ग्रॅम असून ते अडीच ते ४ सेमीचे असेल. दोन्ही विद्यार्थिनींचे सध्या उपग्रह तयार करण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू आहे. १८ ते २२ जानेवारीदरम्यान त्याना ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येईल. दोघिही ‘एसझेडआय वर्ल्ड रेकॉर्ड’ या आंतरराष्ट्रीय व्हॉट्सॲप ग्रुपसोबत जुळलेल्या आहेत.

विद्यार्थिनींच्या यशामध्ये त्यांच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांचे मोठे योगदान असल्याची भावना यावेळी स्वाती आणि काजल या विद्यार्थिनींनी व्यक्त केली. प्रतिकूल परिस्थितीत कसे यश संपादन करायचे याचे उत्तम उदाहरण दोन्ही विद्यार्थिनींनी समाजापुढे ठेवले आहे. तोकडी साधनसामुग्री असूनही या विद्यार्थ्यांनी जागतिक विक्रमापर्यंत मजल मारली आहे. मनपाच्या शाळांमध्ये पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध झाल्यास प्रत्येक शाळेतून असे तारे अंतरिक्षात आपली छाप सोडतील, असा विश्वास सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांनी व्यक्त केला. यापूर्वी सुरेंद्रगड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगल मिशनमध्ये सहभाग घेतला आहे. मनपाच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य हे ‘लोकल टू ग्लोबल’ पोहोचविणे आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण ‘ग्लोबल टू लोकल’ आणणे हाच शिक्षक म्हणून नेहमी प्रयत्न राहिला आहे आणि त्यादृष्टीनेच कार्य सुरू आहे, असेही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या