‘विजयी भव’ : ‘मणिकर्णिका’चं पहिलं गाणं प्रदर्शित

मुंबई : गेल्या वर्षी ज्याप्रमाणे विविध धाटणीच्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती, त्याचप्रमाणे यंदाही वर्षाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटांची मेजवानीच प्रेक्षकांसाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा या विविध चित्रपटांच्या गर्दीत चर्चा आहे ती म्हणजे ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाची.

कंगना राणावत हिच्या मराठमोळ्या लूकमुळं चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून वेळ असला तरी यातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

‘विजयी भव’ असे बोल असलेल्या गाण्यात झाशीच्या राणीचे शौर्य, औदार्य आणि राजकीय चातुर्याचं वर्णन करण्यात आलं आहे. या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिले आहेत, तर, संगीत शंकर-एहसान-लॉय यांचं आहे. ‘मणिकर्णिका’ येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.