आनंदाची बातमी : ससूनमध्ये पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी !

plazma

मुंबई : कोव्हिडचा बरा झालेला पेशंट कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या पेशंटला बरं करू शकतो? जगातल्या अनेक देशांमध्ये याप्रकारे रुग्णांवर उपचार सुरू झालाय. याला प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात. याच प्लाझ्मा थेरपीचा उपचार पुण्यातील ससून रुग्णालयात यशस्वी झाला आहे. ससूनमध्ये पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे.

प्लाझ्मा थेरपीमुळे उच्च रक्तदाब आणि अतिस्थूलपणा असलेली कोरोनाबाधित व्यक्ती ठणठणीत बरी झाली आहे. १० आणि ११ मे या दिवशी थेरपी केलेल्या रुग्णाला आता कोविड वॉर्डमधून हलवण्यात आले आहे. अशी माहिती मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे. दरम्यान, ससूनच्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय ?

एखादा विषाणू शरीरात शिरला की आपलं शरीर त्याला हुसकावून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करतं. विषाणू आणि आपल्यात होणाऱ्या या लढाईत आपले सैनिक असतात ते अँटिबॉडीज. एका विशिष्ट विषाणूला मारण्यासाठी आपलं शरीर विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतं.

या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या वृद्ध व्यक्तीचं शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीनं दोन हात करू शकतं.