fbpx

आजपासून सुरु होणार मोदी 2.0 चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन

loksabha

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे पहिले अधिवेशन आज पासून ( सोमवार ) सुरु होत आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदी विधेयक आणि यासोबतच किमान दहा विधेयके मांडण्यात येणार आहेत.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत देणाऱ्या एनडीएच्या नेत्यांची रविवारी बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत संसद अधिवेशनाची रणनीति, संचालन आणि सरकारकडून कोणते महत्त्वाचे विधेयक मांडण्यात येणार आहेत यावर चर्चा झाली. 4 जुलै रोजी आर्थिक सर्वेक्षण 5 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

संसदेत 17 व्या लोकसभेचे कामकाज हे सोमवारपासून सुरू होणार आहे. हंगामी अध्यक्ष वीरेंद्र कुमार हे 17 आणि 18 जून या दिवसांमध्ये नवीन खासदारांना सदस्यत्वाची शपथ देणार आहेत. तर 19 जूनला लोकसभा अध्यक्षाची निवडण होईल. 20 रोजी राष्ट्रपतीचे अभिभाषण होणार आहे. यानंतर राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होईल. हे अधिवेशन 26 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.