पहिली वातानुकूलित लोकल चर्चगेटच्या दिशेने रवाना

मुंबई  : पश्चिम रेल्वेमार्गावरुन पहिली वातानुकूलित लोकल बोरीवली स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने रवाना झाली. भारत माता की जय या जयघोषात आज सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी ही रवाना झाली. प्रथम फेरी असल्याने या लोकलला फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते.

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी या लोकलच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवला. या लोकलचे दर हे प्रथम दर्जापेक्षा जास्त असून सुरुवातीचे सहा महिने प्रदर्शनीय सूट म्हणून भाडे १.२ पट आकारण्यात येईल. नंतर ते १.३ पट होईल. आठवड्यातील पाच दिवस ही लोकल धावेल.

पहिल्या वातानुकूलित लोकलच्या प्रवासासाठी १६५ रुपये मोजावे लागतील. चर्चगेट ते विरार लोकलचा मासिक पास २०४० रुपये आहे.