स्वस्तात मस्त ! लाँच होण्याआधीच जिओ फोन नेक्स्टचे फीचर्स आणि किंमत झाली लीक

jio phone next

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीची ४४ वी वार्षिक बैठक २ महिन्यांपूर्वी पार पडली होती. या बैठकीमध्ये रिलायन्स काय घोषणा करणार याकडं संबंध देशासह जागतिक बाजारपेठेचं देखील लक्ष लागलं होतं. यानंतर सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो जिओचा सर्वात स्वस्त ५ जी आणि ४ जी स्मार्टफोन ! ५ जी नेटवर्क आणि गुगलच्या सोबत मिळून जिओचा सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होणार आहे.

याचेच ४ जी व्हेरियंट देखील बाजारात येणार असून आता त्याचे फीचर्स आणि किंमत लीक झाली आहे. विशेष म्हणजे, गुगल आणि जिओ टीमने ‘जिओ फोन नेक्स्ट’ हा नवा फोन विकसित केला आहे. याबाबत माहिती देताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी दावा केला होता कि, ‘गूगल आणि जिओने संयुक्तपणे जिओ फोन नेक्स्ट तयार केला आहे. हा एक संपूर्ण फिचर स्मार्ट फोन आहे. हा स्मार्टफोन भारत आणि जगभरातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असेल.’

१० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून हा फोन बाजारात उपलब्ध होणार असून आता तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध तज्ञांनी तसेच सोशल मीडिया प्रमोटर्सनी या फोनच्या फीचर्स बाबत काही गोष्टी स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, जिओ फोन नेक्स्टमध्ये गुगल अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टिम दिली जाईल जी अँड्रॉइड 11 वर आधारित असेल. यात इतर त्रासदायक असे ऍप्स कमी असतील व मूळ अँड्रॉइड आणि गुगल युजर इंटरफेसचा अनुभव या स्वस्स्त स्मार्टफोनमध्ये देण्यात येईल.

तर, क्वालकॉमचा लो एंड चिपसेट देण्यात येईल. फोनमध्ये 2 जीबीपेक्षा कमी रॅम देण्यात येईल. यासोबतच, 32 जीबी आणि 64 जीबी असे दोन पर्याय मिळू शकतात. याशिवाय यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉटचा पर्यायही दिला जाईल. 5.5 इंच आणि 6 इंच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. अद्याप बॅटरीबाबत काही माहिती समोर आली नसून 3000 ते 4000mAh च्या दरम्यान ती असू शकते. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात या फोनच्या किंमतीबाबत विविध अंदाज वर्तवण्यात येत होते. आता काही विश्वसनीय माहिती नुसार जिओ नेक्स्ट फोन ४ जीची किंमत हि ३५०० च्या आसपास असू शकते.

महत्त्वाच्या बातम्या