15 ऑक्टोबरच्या आधी ऊस गाळप सुरु करणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर होणार गुन्हे दाखल

उस गाळप

मुंबई – राज्याचा 2021-22 साठीचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा 15 ऑक्टोबरच्या आधी जे कारखाने ऊस गाळप सुरु करतील, त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, तसंच इतर मंत्री आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एफआरपी अर्थात ऊसाचा रास्त भाव निश्चित करण्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यासगटानं काल आपला अहवाल शासनाला सादर केला. सहकार विभागानं हा अहवाल ऊस नियंत्रण मंडळाकडे सादर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावेत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत आणि पूर्णत्वानं देत नाहीत अशा कारखान्यांकडे आगामी हंगामात गाळपासाठी ऊस द्यायचा किंवा नाही हे शेतकऱ्यांनी ठरवावं, यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनाही देण्यात याव्यात असंही बैठकीत ठरवण्यात आलं. सहकारी साखर कारखान्यांच्या वतीने राज्य साखर संघानं केलेल्या मागण्यांची माहिती बैठकीत देण्यात आली. यावर बैठकीत सर्वंकष चर्चा करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या