मराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात

vasantdada sugar institute sangli

टीम महाराष्ट्र देशा :  मराठवाडा आणि खानदेशातील 19 साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवाना मागितला होता. त्यापैकी 16 कारखान्यांना गाळपाचा परवाना देण्यात आला असून, 10 कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरवात केल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

साखर सहसंचालक कार्यालय, औरंगाबाद अंतर्गत धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड हे सहा जिल्हे येतात. या जिल्ह्यांमध्ये एकूण 37 साखर कारखाने आहेत. यापैकी 24 कारखाने नियमित गाळप करीत असतात. यंदा या कारखान्यांपैकी 19 कारखान्यांनी गाळप परवाना मागितला. त्यापैकी 16 कारखान्यांना 4 डिसेंबरपर्यंत परवाने देण्यात आले होते. परवाना मिळालेल्या कारखान्यांपैकी 24 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान 10 साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरवात केली. त्यामध्ये नंदुरबार, बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन, जळगाव व जालनामधील प्रत्येकी एक, तर औरंगाबाद जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी प्रत्यक्ष ऊस गाळपाला सुरवात केली आहे.

3 डिसेंबर अखेरपर्यंत गाळप सुरू केलेल्या कारखान्यांनी 1 लाख 10 हजार 757 मेट्रिक टन उसाचे गाळप करताना सरासरी 5.28 टक्के साखर उताऱ्याने 58 हजार 515 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी 47 हजार 671 मेट्रिक टन उसाचे गाळप करीत 31 हजार 40 क्विंटल साखर उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील एका कारखान्याने 8440 मेट्रिक टन उसाचे गाळप करीत 3800 क्विंटल साखर उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी 20 हजार 550 मेट्रिक टन ऊस गाळप करीत 9300 क्विंटल साखर उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील एका साखर कारखान्याने 11 हजार 240 मेट्रिक टन उसाचे गाळप करीत 7350 क्विंटल, तर बीड जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी 22 हजार 855 मेट्रिक टन उसाचे गाळप करीत 7025 क्विंटल साखर उत्पादन केल्याची माहिती साखर विभागातर्फे देण्यात आली.

औरंगाबाद येथील साखर सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांत यंदाच्या (2019-20) गाळप हंगामासाठी 84 हजार 65 हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 14585 हेक्टर, जळगाव 6988 हेक्टर, औरंगाबाद 13304 हेक्टर जालना 26471 हेक्टर, तर बीड जिल्ह्यातील 22 हजार 717 हेक्टरवरील ऊस पिकाचा समावेश आहे. यंदा अवेळी पावसाने पिकांना मोठा फटका बसला आहे. शिवाय चाऱ्याची उपलब्धता नसल्याने मोठ्या प्रमाणात ऊस चारा म्हणून वापरला गेला आहे. त्याचा थेट फटका कारखान्यांच्या ऊस गाळपाला बसणार असून उसाची पळवापळवी सोबतच अपेक्षेच्या तुलनेत निम्मा काळ कारखान्यांचे गाळप होईल की नाही, हा खरा प्रश्न आहे.

महत्वाच्या बातम्या