fbpx

कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली : सुभाष देशमुख

सोलापूर–   कांदा अनुदानाची मुदत १५ डिसेंबर ऐवजी ३१ डिसेम्बरपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना दिली.

कांद्याचे भाव ढासळल्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी म्हणून १ ते १५ डिसेंबर पर्यंत जो कांदा बाजार समितीमध्ये विकला गेला आहे,त्या कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला २० क्विंटलपर्यंत मर्यादित असे अनुदान घोषित करण्यात आले होते. हि मुदत वाढूं मिळावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होती.

अनुदानाची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी  कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने उत्तर सोलापुरातील मार्डी गावात सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली होती. त्यावर नामदार देशमुख यांनी तेथूनच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना एसएमएस टाकून मुदत वाढविण्याची विनंती केली असता तत्काळ मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशमुख यांच्या एसएमएसला उत्तर देत कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेम्बरपर्यंत वाढविण्याला ग्रीन सिंग्नल दिला.

पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ३१ डिसेम्बरपर्यंत मुदत वाढविण्यात येत असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय होईल असेही देशमुख यावेळी बोलताना म्हणाले.