‘द आंत्रप्रन्योर’ : उद्योजक होण्यासाठीचा व्यावहारिक आणि वास्तववादी रोडमॅप

bookmark

मयूर सुळ: उद्योजक शरद तांदळे यांचं ‘द आंत्रप्रन्योर’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं. हे पुस्तक वाचल्यानंतर यावर लिहावं असं वाटण्याचं कारण असं, की प्रेरणादायी भाषणे, पुस्तकं यांच्या गराड्यात हे पुस्तक वेगळं ठरतं. उद्योजकतेबाबतचा अनावश्यक कल्पनाविलास न करता व्यवहारी जगात उद्योजक बनण्यासाठी काय करावं आणि काय करू नये हे लेखकाने सांगितलं आहे.

या पुस्तकाची सुरुवात होते ती म्हणजे अगदी एखाद्या साऊथच्या फिल्म सारखी! उनाडक्या हा शब्द बराच प्रचलित, त्यात विशीतल्या मुलांचा आणि ह्याचा काहीही संबंध नाही. संबंध येतो तो त्याच्या अगोदरचा काळ. ना मोबाईल ना सोशल मीडिया! अगदी सोसेल एवढंच अंतर होतं मुलांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये, त्यामुळे जीवनाचा आनंद काय ते ह्या लोकांना कसं समजणार? असो, विषय थोडा भरकटतोय.

अगदी उनाड मुलगा थोडक्यात कॉप्या करून चांगले मार्क्स मिळवले अन् प्रवेश मिळाला Goverment कॉलेजला, तेही इंजिनिअरिंग! बहुतेक मुलं इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात खरे, पण का घेतात आणि त्यात भविष्य काय याचा गांभीर्याने विचारही करत नाहीत. असाच तोही एक होता, कुठं कॉलेजमध्ये मित्रांसाठी भांडणे कर तर कुठे फी वाढं विरोधात आंदोलन करायची ह्यातच दिवस चालले होते. त्यात कधीतरी स्वतः स्वातंत्र्यसैनिक झाल्याचा भास होई. आपण कशासाठी आलो होतो आणि काय करत आहोत ह्याचा थांगपत्ताही लागत न्हवता. एकंदरीत काय तर वयाचा परिणाम!

हे सगळं ह्या वयात कळत नाही, त्याला अनुभव यावा लागतो. कुणी सांगून किंवा समजवून काही बदल होत नसतो. तो होण्यासाठी आतून हाक यावी लागते तेव्हा कुठे बदल दिसून येतो. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कॉलेजचे दिवस संपले, आणि सुरुवात झाली ती खऱ्या आयुष्याला. खरा संघर्ष मुलांचा इथून सुरू होतो, या वयात आपल्याला कोणत्याही क्षेत्रातील व्यवस्थित माहिती नसते त्यामुळे कधी राजकारण, तर कधी समाजकारण, उद्योजक अश्या असंख्य मोठेपणा दाखवणाऱ्या गोष्टी मुलांना भुरळ घालतात.

यावर लेखक म्हणातात, तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे का? आलं पाहिजे. याचं उत्तर आत्ता मिळालं आहे. त्याचं असं आहे की, त्यांच्या तरुण मुलांसाठी कार्यकर्ते पाहिजे असतात. देशाला, राज्याला युवकांची गरज असते. असं म्हणायचं आणि स्वतःच्या मुलाला पक्ष किंवा संघटनेचा नेता म्हणून तयार करायचं. म्हणजे आपण त्या नेत्याच्या तरुण पाल्याला दादा, अण्णा, भैय्या, ताई म्हणायला तयार! काही अर्धवट मुलं त्यांच्या हाताला लागतात. मग ही मुलं पुढं कट्टर समर्थक, निःस्वार्थी कार्यकर्ते बनतात. त्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनाकारण युवक नेता झाल्यासारखं वाटतं.

दर पाच वर्षांला अश्या युवक नेत्यांची नवीन फळी तयार होत असते. काही विचारवंत परिवर्तनवादी विचारांचं धुकं तयार करायचे. त्यात डावे- उजवे समजायला लागले. डाव्या विचारांचा किंवा उजव्या विचारांचा किंवा पुरोगामी यापैकी तुम्ही ज्या विचारांच्या कार्यकर्त्याला पहिल्यांदा भेटाल तो कार्यकर्ता तुम्हाला त्यांच्या विचारांचा बनवून टाकतो. आपला काही अभ्यास नसतो, त्यामुळे आपली नेमकी विचारसरणी कोणती, हे कळण्याच्या आधीच आपण कोणत्याही विचारसरणीचे बनून जातो.

द अंत्रप्रन्योर; हे नुसते पुस्तक नसून संघर्ष आहे. त्या उनाड मुलाचा स्वतःशी आणि समाजाशी. ही एक दिशा आहे, एक मार्ग आहे जो तरुण मुलांना प्रेरणा देऊ शकतो. लढा असं सगळेच म्हणतात, पण खरा आयुष्यातील संघर्ष काय आहे ते कोणीच सांगत नाही, किंबहुना मार्गदर्शनही करत नाही. हे पुस्तक त्या तमाम तरुणांच्या जखमेवर एक जालीम औषध म्हणून साबित होऊ शकतं.

या पुस्तकातील आणखी एक प्रसंग मोठा प्रभाव मागे ठेवून जातो. आपला मुलगा सातत्याने अयशस्वी होतोय हे पाहून वडील त्याला भेटायला पुण्याला येतात. मुलगा त्यांची माफी मागतो. येथे लेखक म्हणतात, माफी मागितल्याने माझं डोकं कमालीचं शांत झालं. फळं घेऊन परत निघताना ते थांबले आणि म्हणाले,
शरद, एक गोष्ट सांगतो, तुला माहिती आहे का फुलपाखराचा जन्म कसा होतो?
मी म्हणालो,
हो. आळी मातीचा ढिगारा तयार करते. मग त्या ढिगाऱ्यातील आतील आळी ढिगारा फोडून बाहेर येते आणि फुलपाखरू उडतं.
त्यावर ते समजावत म्हणाले,
तो ढिगारा बाहेरून फोडला तर आळी बाहेर येईल आणि जर त्या आळीने तो ढिगारा आतून फोडला तर फुलपाखरू बनून उडेल.आपलं सुद्धा तसचं असतं. तुला वाटतं मोठं व्हावं, तर तुझ्या भोवतीचा तुला दिसत नसलेला मातीचा ढिगारा तुला आतून फोडावा लागेल. त्यामुळे तू आळी म्हणून न जन्मता फुलपाखरू म्हणून उडशील. आता तूच ठरव की तुला आळी म्हणून जगायचं, की फुलपाखरू बनून उडायचं.

ते म्हणतात ना, जर वडील बरोबर असतील तर तुमच्या विरोधात किती लोक आहेत याने जास्त फरक पडत नाही.
फक्त वडिलांनी आपल्या पाल्यावरती रागवण्यापेक्षा त्याला समजून सागितलं तर ते खूप फायद्याचं ठरू शकत.

लेखक म्हणतात, आपल्याला नेमकं काय हवं हे पक्क झालं तर दिशा ठरवता येते. त्यासाठी मेंदूला डिटॉक्स करायला जमलं पाहिजे. जसे लोक आयुर्वेदिक औषधांनी, पाण्याने, व्यायामाने आपलं शरीर विषारी द्रव्यांपासून डीटॉक्स करतात. तसंच मेंदूला शांत करून चिल्लर स्वप्नांपासून एकदा डीटॉक्स करून बघितलं पाहिजे. हे करण्यासाठी सगळ्यांपासून दूर राहता आलं पाहिजे. त्यासाठी लोक विपश्यना केंद्रात जातात. विपश्यना केंद्रात न जाता हे करणं अवघड आहे, पण प्रयत्न करून बघायला हरकत नाही.

एकदा सगळ्यांसोबत राहूनही डीटॉक्स होता आलं तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच सापडतील. आपण मित्रांचा, नातेवाईकांचा विचार करत विनाकारण नाती जपण्याच्या नादात मनःस्ताप करून घेत असतो. याला भेटलो नाही, त्याच्याशी बोललो नाही, अमक्याच्या लग्नाला गेलो नाहीतर नातं तुटेल, अशी भीती वाटत असते. जवळचं नातं जपण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं नसतं. आपल्या वागणुकीतून ते टिकत असतं. आपण कामात असलो तर खरी नाती ते समजवून घेतात. तसंही नातं हलकं आहे की मजबूत,हे बघण्यासाठी सर्वांपासून डीटॅच होऊन बघितल पाहिजे. डीटॉक्स आणि डीटॅच झाल्याशिवाय संयमित आयुष्याला सुरुवात नाही करता येत.

अशा प्रकारे अगदी हलक्या भाषेत लेखकांनी त्यांचा संघर्ष मांडला आहे, कॉलेजच्या उनाडक्यापासून ते लंडन मध्ये यंग अंत्रप्रन्योर पुरस्कार मिळाला तिथं पर्यंत. बघू करू म्हणण्यापेक्षा करून बघू हा Positive Attitude मला प्रामुख्याने आवडला. प्रत्येक तरुणाने वाचावं असं हे पुस्तक आहे. कधी कधी अनुभव घेऊन शिकणं हे खूप महागात पडतं. कधीतरी दुसऱ्यांच्या चुकातूनही आपण शिकायचं असतं आणि आपली दिशा ठरवायची असते. ही दिशा ठरवण्यासाठी शरद तांदळे यांचं ‘द आंत्रप्रन्योर’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचलंच पाहिजे!

– मयूर सुळ

महत्वाच्या बातम्या :-