अभियंत्यांचा उचित सन्मान व्हायला हवा

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; 'अभियंता मित्र' पुरस्कारांचे वितरण

पुणे : भारताच्या विकासात अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. केवळ 2 टक्के भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांमुळे 98 टक्के प्रामाणिक अभियंत्यांवर खापर फोडले जाते. अभियंत्यांची होत असलेली ही उपेक्षा थांबावी, तसेच त्यांचा उचित सन्मान व्हावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवारी केले.
विकासकर्मी अभियंता मित्र, सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभाग आणि पुणे महानगरपालिका अभियंता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या वाढदिवसानिमित्त व कमलाकांत वडेलकर यांच्या एकसष्टीनिमित्त गुणवंत अभियंते आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांना ‘अभियंता मित्र पुरस्कार’ देऊन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या कार्यक्रमावेळी अभियंते अजित पवार, नंदकुमार वडनेरे, विजयकुमार ठुबे, अर्जुन कोकाटे, अभियंता मित्र मासिकाचे संपादक कमलकांत वडेलकर, सौ. सबनीस, उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, अभियंता हा विकासाचा केंद्रबिंदू आहे. बुद्धिमतेच्या आणि कल्पकतेच्या जोरावर तो विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांची उभारणी करतो. मात्र, शेवटी त्या कामाच्या श्रेयात त्याचे स्थान नसते. कोनशिलेवर पुढाऱ्यांचे नाव घातले जाते. अशा या अभियंत्यांच्या कथा व व्यथा मांडण्यासाठी कमलाकांत वडेलकर अभियंता मित्रच्या माध्यमातून गेली तीस वर्षे काम करत आहेत. विकास आणि अभियंता यांच्यातील अनुबंध जोडण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.

You might also like
Comments
Loading...