शेअर बाजारात फायदा झाल्याचे सांगून इंजिनिअरला २४ लाखांना फसवले

online, fraud

बीड : हल्ली ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. वारंवार आवाहन करूनही नागरिक जागरूक होत नाहीयेत. विशेष म्हणजे फसवणूक होणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षित लोकांचा समावेश आहे. असाच एक प्रकार बीडमध्ये घडलाय. शेअर मार्केटमध्ये फायदा झाल्याचे सांगून एका अभियंत्याला २४ लाख २९ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार बीडमध्ये समोर आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनूसार, उदयसिंह प्रतापराव जगताप (३१, रा. दत्तनगर, बीड) हे अभियंता आहेत. ते शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. शेअरमध्ये अधिकचा फायदा होण्यासाठी पैसा कुठल्या शेअरवर गुंतवावा यासाठी टिप्स घेण्यासाठी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने काही जणांशी संपर्क केला. दरम्यान, २५ जानेवारी ते ५ मार्च २०२१ या कालावधीत तीन वेगवेगळ्या क्रमांकांवरून कॉल आले. त्यांनी त्यानुसार शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले.

त्यानंतर तुम्हाला मोठा आर्थिक फायदा झाल्याचे सांगून तीन वेगवेगळ्या क्रमांकांवरून गुगल पे, नेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी या माध्यमातून १० टक्के रक्कम भरण्यास सांगत एकूण अडीच महिन्यांत जगताप यांच्याकडून २४ लाख २९ हजार ८३४ रुपये या भामट्यांनी उकळले. पैसे भरूनही रक्कम मिळत नसल्याने जगताप यांनी अधिक चौकशी केली असता आपल्याला कोणता फायदा झाला नसून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तीन मोबाईल क्रमांकधारकांविरोधात तक्रार दिली. यावरून फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या