होय EVM मशीनमध्ये फेरफार झाला आहे

वेबटीम : बुलढाणा जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०१७ करिता सुलतानपूर येथील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाला असल्याचा चौकशी अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आहे. माहिती अधिकारात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

संपूर्ण देशात ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनमधील घोळाची चर्चा असून राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीन घोळ सिद्ध करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले होते. बुलढाणा जि.प. निवडणुकीत हा घोळ झाला असल्याचे खुद्द निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली याना बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने ही दिली आहे. गलगली यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २० जून २०१७ रोजी अपक्ष उमेदवार आशा झोरे यांनी केलेली तक्रार आणि त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालाची माहिती मागितली होती.त्यामुळे ‘नारळासमोरचे बटण दाबले तरी लाइट मात्र कमळासमोरचा पेटतो’ ही मतदारांची शंका बुलढाणा मध्ये खरी ठरली आहे.

नक्की काय झाले
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्वाचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक १६ फेब्रुवारी २०१७ रोजी बुलढाणा जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०१७ करिता सुलतानपूर ५७/६ या मतदान केंद्रात उमेदवार क्रमांक १ च्या नारळ बटणासमोरील लाइट न लागता उमेदवार क्रमांक ४ यांच्या कमळ बटणासमोर एलईडी लाइट लागत असल्याची तक्रार सकाळी १० वाजता केली. त्यानंतर दीडच्या दरम्यान परत अन्य मतदाराने तक्रार करताच केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांनी उमेदवार प्रतिनिधींच्या संमतीने खात्री केली असता मतदान अधिकारी माणिकराव बाजड यांना तक्रारीत तथ्य आढळून आले.