अर्थव्यवस्थेतील मंदी ही देशासाठी चिंताजनक बाब, माजी गवर्नर रघुराम राजन यांचा दावा

raghuram-rajan

टीम महाराष्ट्र देशा : आरबीआयचे माजी गवर्नर रघुराम राजन यांनी देशाच्या घसरत्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले आहे. राजन यांनी देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी खूपच चिंताजनक असून लवकरात लवकर ऊर्जा क्षेत्र, बिगर बॅंकिंग वित्तीय क्षेत्रांच्यासंदर्भात सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले आहे.

रघुराम राजन यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना राजन यांनी ‘खासगी क्षेत्रातील विश्लेषकांनी वेगवेगळे विकासदराचे उद्दिष्ट मांडले आहे. मात्र, त्यातील बहुतांश विकासदर हे सरकारच्या संभाव्य विकासदरापेक्षा कमी आहे. मला असे वाटते की, अर्थव्यवस्थेचे थंडावणे हे खरोखरच खूप चिंताजनक आहे त्यासाठी सरकारने ऊर्जा क्षेत्र, बिगर बॅंकिंग वित्तीय क्षेत्रांच्यासंदर्भात तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे जेणेकरून खासगी क्षेत्राला गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल असं राजन याचं म्हणणे आहे.

तसेच त्यांनी चीन आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. यात त्यांनी अमेरिकेत काही कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये कर्जाची थकबाकी प्रचंड आहे. चीनमध्येही उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कर्जे देण्यात आली आहेत. या देशांच्या सरकारांवरही प्रचंड कर्ज आहे. २००८ मध्ये बँकांनी दिलेली कर्ज हा मोठा घटक होता. आजची परिस्थिती चांगली आहे म्हणण्यापेक्षा वेगळी आहे असं विधान केले.

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी मी काही मोठ्या आर्थिक अरिष्टाची भविष्यवाणी करू शकत नाही. मात्र, जेव्हा ते येईल तेव्हा त्यामागची कारणे वेगळी असतील. आज वित्तसंस्थांमुळे मोठे अरिष्ट उद्भवलेले नाही. मात्र व्यापार, जागतिक गुंतवणूक हे मुद्दे जास्त चिंताजनक आहेत असं मत व्यक्त केले.