fbpx

जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यास कटीबद्ध : सहकारमंत्री

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारी बँक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही बँक टिकली पाहिजे. बँकेवर आता प्रशासक आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी या बँकेत आपण कधी राजकारण आणले नाही आणि यापुढेही कधी राजकारण आणणार नाही. अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेला उर्जितावस्थेत आणून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

जिल्हा बँकेचे कर्मचारी व गटसचिव यांच्यासाठी बँकेच्यावतीने रविवारी आज जामगोंडी फार्म येथे एक दिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार आयुक्त सतीश सोनी, साखर सहसंचालक डॉ. संजयकुमार भोसले, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे, विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, सह निबंधक चांगदेव पिंगळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे, उपनिबंधक कुंदन भोळे, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी प्रदीप झिले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सहकार मंत्री देशमुख म्हणाले, बँकेवर प्रशासक येण्यापूर्वी काही शिक्षकांनी पगार खाती जिल्हा बँकेतून काढण्याची मागणी केली होती. शिक्षकांची मागणी मान्य केली नाही. त्यांची पगार खाती याच बँकेत ठेवायला लावली. त्यांना बॅंकेबाबत विश्वास दिला. त्यामुळे आपण नेहमी बँकेचे हितच पहिले, असेही ते म्हणाले, यावेळी सहकार आयुक्त सोनी म्हणाले, जिल्हा बँकेची थकीत कर्जे वसूल करण्यसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे. बँकेच्या व्यवस्थापनात बदल केल्यास लवकरच बँक या आर्थिक संकटातून बाहेर पडेल.

प्रशासक कोतमिरे यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटनानंतर शेती व बिगर शेती कर्जवसुली विषयावर साखर सहसंचालक डॉ. संजयकुमार भोसले, व्यवसायवृद्धी व नियोजन या विषयावर सांगली जिल्हा बँकेचे उपव्यवस्थापक सुधीर काटे, कॉंग्रेहेन्सीव्ह टर्न अराउंड प्रोजेक्ट विषयावर नाबार्डचे डीजीएम. दि. के गवळी, स्ट्रेस मॅनेजमेंट विषयावर यशदाचे राज्यस्तरीय प्रशिक्षक शिवाजी पवार यांचे व्याख्यान झाले.