मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतल्याननंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर ममता यांनी भाजप सोबतच कॉंग्रेसवर देखील निशाणा साधला होता.दरम्यान, ममतांच्या या दौऱ्याविषयी राऊत यांनी आपल्या सामनाच्या रोखठोकमधून भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले की, दिल्लीत ममता बॅनर्जी यांना भेटण्याचा योग अनेकदा येतो. मुंबईच्या ‘ट्रायडेण्ट’ हॉटेलात आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने त्यांना भेटलो. ममता मुंबईतील उद्योगपतींना भेटण्यासाठी आल्या. उद्योगपतींनी प. बंगालात यावे हे निमंत्रण घेऊन त्या आल्या. त्यांनी उद्योगपतींची बैठक विनम्रपणे बोलावली. तेव्हा मला गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मुंबई दौऱ्याची आठवण झाली. मुंबईतील उद्योगपतींना गुजरातेत येण्याचे निमंत्रण घेऊन त्या आल्या व मुंबईत येऊन मुंबईचीच बदनामी करून गेल्या. ”मुंबई में क्या रखा है? इथले रस्तेही खराब आहेत. तेव्हा गुजरातला चला’ असे निमंत्रण त्यांनी दिले. तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील विकासाचे उद्योगपतींकडे कौतुक केले व प. बंगालकडे दृष्टी वळवा, असे सांगितले. शेवटी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, पण महाराष्ट्राचीही ती राजधानी आहे. याचे भान ठेवून जे राज्यकर्ते मुंबईत उतरतात त्यांचे स्वागत आहेच. देशाचा आर्थिक भार मुंबईच्या डोक्यावर आहे. मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राच्या राजधानीने हातभार लावला तर ते राष्ट्रीय कार्यच ठरेल. महाराष्ट्राने प. बंगालच्या विकासासाठी सहकार्य करायला हवे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’यावेळी आदित्य यांच्याकडे ममता बॅनर्जी यांनी एक मागणी केली, ‘प. बंगालमधून मुंबईत उपचारासाठी लोक येतात. विशेषतः परळच्या टाटा कॅन्सर इस्पितळात. त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. प. बंगालला एखादा भूखंड मिळाला तर तेथे ‘बंगाल भवन’ उभारता येईल व अशा गरजूंची व्यवस्था करता येईल.’ ममता बॅनर्जी यांची मागणी अवाजवी नाही. मुंबईच्या आसपास ओडिशा भवन, उत्तर प्रदेश भवन आधीच उभे राहिले आहे. प. बंगालचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक क्रांतीत योगदान आहे. दोन राज्यांत एक भावनिक नाते आहे. ते टिकवायला हवे’, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- त्यांच्या रडगाण्याशी आम्हाला घेणे देणे नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला
- मुलगी आराध्याला ट्रोल करणाऱ्यांवर अभिषेक बच्चन का भडकला ; जाणून घ्या कारण
- अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे; फडणवीसांचे शिवसेनेवर ताशेरे
- तिसऱ्या लाटेबद्दल आरोग्यमंत्र्यांच मोठं विधान; म्हणाले, तिसरी लाट…
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<