लिफ्टच्या दरवाज्यातच महिलेची प्रसुती; बाळाचा जमिनीवर पडून मृत्यू 

औरंगाबाद – येथील घाटी रुग्णालयात स्ट्रेचर नसल्यामुळे गर्भवतीला चालत नेत असताना लिफ्टच्या दरवाज्यातच महिलेची प्रसुती झाली आहे. यात एक धक्कादायक घटना घडली आहे की, प्रसुतीनंतर बाळाचा जमिनीवर पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याआधी याच रुग्णालयात सलाईन स्टँड नसल्यामुळे वडिलांचा जीव वाचविण्यासाठी लहान मुलीला सलाईनची बाटली देऊन उभे केले होते.

सोनाली खटमोडे या माहेरी बाळंतपण करण्यासाठी आल्या होत्या. काल रात्री 1च्या सुमारास सोनाली यांना प्रसुतीकळा सुरु झाल्या. प्रसुतीकळा सुरु झाल्यानंतर त्यांची आई आणि नवऱ्याने त्यांना घाटी रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयात स्ट्रेचर नसल्याने त्यांना चालतच रुग्णालयाच्या लिफ्टपर्यंत जावे लागले. सोनाली चालत कशाबशा लिफ्टपर्यंत पोहोचल्या. पंरतु लिफ्टच्या दरवाज्यातच त्यांची प्रसुती झाली. प्रसुतीनंतर त्यांचं बाळ जमिनीवर पडलं आणि त्यानंतर बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे .

‘राज्यातील सरकारी रुग्णांलयांतील आरोग्यव्यवस्था उत्कृष्ट असल्याचे दावे आपल्या सरकारकडून केले जातात. पण यामध्ये तथ्य नसल्याचे या घटनेतून उघड  झाले आहे. या संपूर्ण घटनेची सर्वंकष चौकशी होऊन या गलथानपणाला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई झालीच पाहिजे.’

– सुप्रिया सुळे,खासदार 

 

‘घाटी रुग्णालयात घडलेल्या प्रकरणाची माहिती घेत आहे. याप्रकरणी चौकशी करणार असून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. ही घटना दुर्देवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्व रुग्णालयांची पाहणी करणार आहे.’

– एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री