आता टक-टक होणार बंद

वेबटीम : संगणक आल्यामुळे बऱ्याच कामगारांना घरी बसण्याची वेळ आल्याच्या बातम्या नेहमीच कानावर पडत असतात.संगणकामुळे फायदा होत गेला तसा वेळोवेळी रोजगाराचा प्रश्नही निर्माण होत गेला. आता ही वेळ टंकलेखन प्रशिक्षण संस्थांवर आली आहे.
सध्या अनेक गोष्टींना पर्याय म्हणून संगणकाकडे पाहिलं जातं. कधीकाळी मनुष्यबळाशिवाय पर्याय नसणारी कामे संगणकाने सहज होऊ लागली. मात्र पारंपरिक पद्धतीने जी कामे कामगार करत होते त्यांना मात्र संगणक शत्रू प्रमाणे भासू लागला आहे.
टंकलेखन प्रशिक्षण संस्थांना देखील याचा मोठा फटका बसला असून रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. टाईपरायटर वापरावर बंदीच्या निर्णयाची प्रक्रिया दोन वर्ष सुरु आहे. टंकलेखन प्रशिक्षण संस्थांवर अचानक कोसळणारी बेरोजगारीची कुऱ्हाड पाहता या निर्णयाला स्थिगिती देण्यात आली होती. येणाऱ्या काळात सरकारी कामातही संगणक प्रशिक्षणालाच प्राधान्य असणार असल्याने टाइपरायटर कालबाह्य होणार आहे. २०१३ मध्ये शासन निर्णयानुसार टाइपरायटर टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याचे ठरवण्यात आले होते. त्यामुळे नंतर टंकलेखनाची परीक्षा संगणकावरच घेतली जात होती, पण टंकलेखन यंत्रांचा पर्यायही ठेवला होता. याला महाराष्ट्रातील टंकलेखन प्रशिक्षकांकडून जोरदार विरोध झाला होता. काही प्रशिक्षण संस्थामध्ये टंकलेखनाचे प्रवेशही सुरुच होते. ‘आता १२ ऑगस्टला टंकलेखन यंत्राच्या माध्यमातून अखेरची परीक्षा होत आहे’, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले. १८ ऑगस्टपासून सर्व परीक्षा संगणकावरच घेतल्या जाणार आहेत त्यामुळे टाइपरायटर म्हणजे टंकलेखनाचा वापर आता यापुढे होणार नाही. आता एकही टंकलेखनाची परीक्षा होणार नाही त्यामुळे आज होणाऱ्या परीक्षेत शेवटची टकटक ऐकू येणार आहे.

कोणाला होणार तोटा ?
टाइपरायटर बंद होत असल्याने ३५०० खासगी टंकलेखन प्रशिक्षण संस्थांना फटका बसणार आहे, असे बॉम्बे कॉमर्स एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर डंबाल यांनी सांगितले. या निर्णयाने ३५०० संस्थांतील १० हजार प्रशिक्षक बेकार होणार आहेत. प्रत्येक शहरातील नाक्यानाक्यावर वर्षानुवर्षे सुरु असलेल्या टंकलेखन प्रशिक्षण कर्त्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. टाइपरायटरचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करायला हवा होता पण त्यात घाई केली जात आहे, असे लघुलेखन व टंकलेखन संस्थेचे अशोक अभ्यंकर यांनी सांगितले.